आठवडी बाजारामार्फत महिला बचत गटांना व्यवसायासाठी मिळणार हक्काचे व्यासपीठ –
मंत्री मंगल प्रभात लोढा
मुंबई उपनगरात प्रथमच आठवडी बाजाराचे आयोजन
मुंबई,
मुंबई उपनगर जिल्ह्यात जनता दरबार उपक्रमांतर्गत महिला बचत गटांच्या व्यवसाय विषयक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींमार्फत महिला बचत गटांना त्यांच्या वस्तू विकण्यासाठी जागेची गरज असल्याचे समजले. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या महिला बचत गटांना व्यवसायासाठी हक्काची जागा मिळावी, या उद्देशाने ‘आठवडी बाजार’ आयोजित करण्याचे निर्देश दिले.
त्यानुसार दिनांक १९ ऑगस्ट २०२३ रोजी महापालिकेच्या एन विभागाच्यावतीने प्रथमच आठवडी बाजार आयोजित करण्यात येणार आहे. मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते या आठवडी बाजाराचे उदघाटन देखील होईल. घाटकोपर पूर्व येथील पटेल चौकातल्या सुविधा बिझनेस पार्कच्या दुसऱ्या मजल्यावरील पार्किंग लॉटमध्ये दिनांक १९ ऑगस्ट रोजी दुपारी १ ते रात्री ९ या वेळेत आणि २० ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत या आठवडी बाजाराचे आयोजन करण्यात आले आहे.
या आठवडी बाजाराच्या माध्यमातून दर आठवड्याला नोंदणी केलेल्या ५० महिला बचत गटांना आपल्या वस्तू विकण्यासाठी महापालिकेतर्फे हक्काची जागा मिळेल. या जागेसाठी बचतगटांना कोणत्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागणार नाही तसेच कार्यक्रमाच्या आयोजनाची आणि जागा उपलब्ध करून देण्याची संपूर्ण जबाबदारी महापालिकेतर्फे पूर्ण करण्यात येईल. या कार्यक्रमाचा प्रचार व प्रसार महापालिकेतर्फे करण्यात येईल, जेणेकरून महिला व्यवसायिकांना अधिक ग्राहक उपलब्ध होतील. त्याचप्रमाणे स्थानिक परिसरातील व्यापारी वर्गाला देखील आठवडी बाजारासाठी निमंत्रित करून महिला बचत गटांशी जोडण्याचा शासनाचा मानस आहे, जेणेकरून महिलांना आर्थिक विकासाच्या अधिक संधी प्राप्त होतील.