देशाचे आधारस्तंभ घडविण्याचे काम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्राद्वारे होणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
देशाचे आधारस्तंभ घडविण्याचे काम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्राद्वारे होणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्रातून विविध प्रकारचे शिक्षण मिळणार आहे, या उपकेंद्राच्या माध्यमातून देशाचे आधारस्तंभ घडविण्याचे काम होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
आज दिंडोरी तालुक्यातील शिवनाई येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राच्या नियोजित इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूरश्यप्रणालीद्वारे संवाद साधत होते. कार्यक्रमास केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार, राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. कारभारी काळे, उपकुलगुरु डॉ. संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, दिंडोरी प्रांताधिकारी संदीप आहेर, शिवनाई गावच्या सरपंच सुनंदा निंबाळकर यांच्यासह शिवनाई गावाचे गावकरी, महाविद्यालयांचे प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा पाया रचला आहे. या शिक्षणात बदलत्या काळानुसार नवीन तंत्रज्ञान उपलब्ध होत असून या तंत्रज्ञानाचा वापर आपण आपल्या प्रगतीसाठी कसा करतो हे महत्त्वाचे आहे. नाशिक उपकेंद्राच्या माध्यमातून सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ होणार आहे. तसेच या उपकेंद्रांची संख्या अजून वाढवून प्रत्येक घरात शिक्षण पोहचविण्याचे काम करणे अपेक्षित आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला आवश्यक शिक्षण मिळण्यासाठी संबंधित क्षेत्रातील माहिती असणे आवश्यक असते आणि माहितीचे रूपांतर ज्ञानार्जनात करण्याचे काम या नाशिक उपकेंद्रामार्फत होणार आहे. विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत, त्यांच्या उज्वल भविष्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येवून काम करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे राजकारणाच्या पलीकडे जावून जनतेच्या कल्याणासाठी विचार केला तरच राज्य प्रगतीच्या वाटेवर यशस्वी वाटचाल करू शकेल, असा विश्वासही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.