नितीन चंद्रकांत देसाई आत्महत्येप्रकरणी रशेष शाह आणि एआरसी एडेलवेस कंपनीची चौकशी होणार
मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांच्या मागणीवर उपमुख्यमंत्र्यांची घोषणा
मुंबई, दि. 3
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई आत्महत्येप्रकरणी रशेष शाह आणि एआरसी एडेलवेस कंपन्यांची सुध्दा चौकशी केली जाईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली.
आमदार अँड आशिष शेलार यांनी आज विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करून नितीन देसाई यांच्या मृत्यूची अपघाती मृत्यू एवढीच चौकशी न करता ही चौकशी अधिक व्यापक करण्याची मागणी त्यांनी केली.
याबाबत आमदार अँड आशिष शेलार म्हणाले की,
आपल्या कर्तृत्त्वाने, प्रतिभेने कलादिग्दर्शन क्षेत्रात आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणारे, चार राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे नितिन चंद्रकांत देसाई यांनी दुर्दैवीरीत्या आपले जीवन संपवले. त्यांनी एनडी स्टुडिओवर १८० कोटींचे कर्ज काढले होते. या १८० कोटींचे २५२ कोटी झाले. या प्रकरणातून रशेष शाह नामक व्यक्ती आणि ‘एआरसी एडेलव्हाईस’ कंपनीच्या सावकारी पद्धतीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे केवळ अपघाती मृत्यू म्हणून या प्रकरणाची चौकशी न करता या कंपनीच्या व्याजाचा दर, व्याज वृद्धीचा दर, वसूलीची पद्धत या सर्व कार्यपद्धतीची विशेष टीम नेमून चौकशी करावी आणि दिवंगत नितीन चंद्रकांत देसाई यांना न्याय द्यावा, अशी मागणी सभागृहात केली. या कंपन्या आधुनिक सावकार असून त्यांची अन्य दोन प्रकरणाची माहिती आपल्याकडे असून तीही गृहमंत्र्यांकडे देणार असल्याचे सांगितले.
दरम्यान, त्यावर उत्तर देताना गृहमंत्र्यांनी अशी चौकशी करण्याचे मान्य केले.