मणिपूर सरकार त्वरित बरखास्त करा – नसीम खान
इंडिया आघाडीची मुंबईतील बैठक महाविकास आघाडीतील घटक पक्षांसह मिळून यशस्वी करू : नसीम खान
मुंबई
दि. २१ जुलै :-
मणिपुर मध्ये घडलेल्या निंदनीय घटनेचा तीव्र निषेध करीत देशाचे महामहीम राष्ट्रीय अध्यक्षा यांच्याकडे मणिपुर सरकार त्वरित बरखास्त करण्याची मागणी आज माजी मंत्री व महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष मो. आरिफ (नसीम) खान यांनी केली.
नसीम खान आज विधानभवनात पत्रकारांशी बोलताना पुढे म्हणाले की, ज्याप्रमाणे मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार होत आहे, लोकांच्या हत्या होत आहे, हजारो लोक बेघर झालेले आहेत आणि तेथील रहिवाशी दहशतीच्या खाली आपले जीवन जगत आहे अशी परिस्थिती असतानाही केंद्रातील मोदी सरकार गेल्या तीन महिन्यापासून घडत असलेली घटना एक मुकदर्शक म्हणून बघत असुन त्या ठिकाणी शांतता बहाल करण्यासाठी कसल्याही प्रकारचे काम करत नसल्यामुळे आणि कशाप्रकारे महिलांना निर्वस्त्र करून त्यांच्या अत्याचार होत असल्याची घटना पाहून देशातील प्रत्येक नागरिकांच्या मनात मोदी सरकार विरुद्ध तीव्र नाराजगी आहे म्हणून देशाच्या महामहिम राष्ट्रीय अध्यक्षा यांनी स्वतः हस्तक्षेप करून मणिपूर मधील भाजपा सरकार त्वरीत बरखास्त करावी आणि तेथे शांतता बहाल करण्यासाठी योग्य ते पावले उचलावी अशी मागणी नसीम खान यांनी केली आहे
पत्रकाराच्या प्रश्नाचे उत्तर देत असताना नसीम खान म्हणाले की,
केंद्रातील हुकुमशाही वृत्तीच्या मोदी सरकारविरोधात काँग्रेस पक्षाने लोकशाही मानणा-या २६ समविचारी पक्षाची इंडिया आघाडी केली आहे. देशातील लोकशाही आणि संविधान वाचविण्यासाठी करण्यात आलेल्या या आघाडीची पुढील बैठक मुंबईत होणार असून काँग्रेस पक्षासह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष मिळून ही बैठक यशस्वी करू असे माजी मंत्री व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष नसीम खान यांनी म्हटले आहे. तसेच भारत देश, देशातील लोकशाही आणि संविधान वाचविण्यासाठी काँग्रेस पक्षाने समविचारी पक्षांना सोबत घेऊन इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. या आघाडीची पहिली बैठक पाटणा येथे पार पडली होती. दुसरी बैठक बंगळुरु येथे पार पडली असून या बैठकीत इंडिया हे नाव ठरले आहे.
या इंडिया आघाडीची पुढची बैठक मुंबईत घेण्याचे बंगळुरु येथील बैठकीत निश्चित करण्यात आले आहे. ही अत्यंत स्वागतार्ह बाब असून काँग्रेस पक्षासह महाविकास आघाडीतील सर्व पक्ष मिळून ही बैठक यशस्वी करतील असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष नसीम खान यांनी म्हटले आहे.