• ठाणे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचे प्रतिपादन
• आयुक्तांनी केली श्री. शरदचंद्र पवार मिनी क्रीडा संकुलाची पाहणी
विजय कुमार यादव
ठाणे (१३) : ठाणे महानगरपालिकेच्या ढोकाळी येथील श्री. शरदचंद्र पवार मिनी क्रीडा संकुलाची पाहणी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी बुधवारी केली. खेळाडूंच्या अडचणी प्राधान्याने दूर करून या क्रीडा संकुलाचा वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांसाठी जास्तीत जास्त वापर करावा, असे निर्देश श्री. बांगर यांनी दिले.
या क्रीडा संकुलातील दुरुस्ती आणि परिसराचे काँक्रीटीकरण करण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने सादर केला आहे. त्यावर निर्णय घेण्यापूर्वी आयुक्त श्री. बांगर यांनी क्रीडा संकुलाच्या स्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्याचा निर्णय घेतला. सन २०१४ मध्ये लोकार्पण झालेल्या या क्रीडा संकुलात बॅडमिंटन, क्रिकेट, व्हॉलीबॉल, टेनिस, टेबल टेनिस, कॅरम आणि बुद्धिबळ हे खेळ खेळण्याचा सुविधा उपलब्ध आहेत. या भेटीदरम्यान बॅडमिंटन आणि क्रिकेटचा सराव आयुक्त श्री. बांगर यांनी पाहिला. तसेच, बॅडमिंटनच्या प्रशिक्षकांशी संवाद साधला.
बॅडमिंटन हॉलमध्ये अजूनही काही प्रमाणात गळती होत आहे. बॅडमिंटन कोर्टचे फ्लोअरिंग असमान झाले असून त्याची दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. हवा खेळती राहण्यासाठी त्या हॉलच्या क्षमतेचा विचार करून एक्झॉस्ट फॅन बसविणे, हॉलची प्रकाशमानता वाढविणे. तसेच, प्रेक्षक गॅलरीत बसवण्यात आलेल्या काचांची सुरक्षा वाढविणे, या गोष्टी योग्य पद्धतीने मार्गी लावण्याच्या सूचना आयुक्त श्री. बांगर यांनी दिल्या.
क्रीडा संकुलातील अंतर्भागात भिंतीवर लावण्यात आलेल्या टाइल्स मोठ्या प्रमाणावर निखळल्या आहेत. मोठ्या काचा पडू लागल्या आहेत. तसेच, गळतीमुळे काही ठिकाणी फॉल सिलिंगचेही नुकसान झाले आहे. पारदर्शक छतासाठी बसविण्यात आलेले पत्रेही जीर्ण झाले आहेत म्हणून गळती होते, असे म्हणणे क्रीडा संकुल व्यवस्थापनाने मांडले. त्यावर, त्या पत्र्यांची क्षमता तपासून पाहून आवश्यकता भासल्यास पूर्ण पत्रे बदलावेत आणि आवश्यक त्या दुरुस्ती करून घ्याव्यात, असे आयुक्त श्री. बांगर म्हणाले. ही कामे दोषता निवारण कालावधी (डिफेक्ट लायबिलिटी पिरियड) मध्ये असल्यास ती संबंधित कंत्राटदारांकडून करून घ्यावीत, असेही आयुक्त श्री. बांगर यांनी स्पष्ट केले.
क्रीडा संकुलाच्या आवारात यू टी पद्धतीने काँक्रीटीकरण प्रस्तावित आहे. हे काम करण्यापूर्वी क्रीडा संकुलाच्या आतील कामे प्राधान्याने करावीत. ज्याचा खेळाडूंना फायदा होणार आहे अशी कामे पूर्ण झाल्यावर आवश्यकतेनुसार बाहेरील कामे हाती घेतली जावीत, असे निर्देश आयुक्त श्री. बांगर यांनी दिले.
क्रीडा संकुलाच्या बाह्य भिंतीवरील क्रीडापटूंची चित्रे चांगल्या दर्जाची असावीत, अशी अपेक्षाही आयुक्त श्री. बांगर यांनी व्यक्त केली.
क्रीडा संकुलाच्या आतील प्रस्तावित कामांच्या अंदाजपत्रकानुसार प्रत्यक्ष पाहणी केल्यावर आयुक्त श्री. बांगर यांनी अंदाजपत्रकातील बाबी अधिकाऱ्यांसमक्ष पडताळून पाहिल्या. त्यात आढळलेल्या त्रुटींचा जाबही आयुक्तांनी विचारला. अंदाजपत्रक बनविताना प्रत्यक्ष साईटवर पाहणी करून, व्यवस्थित विचार केल्याशिवाय अंदाजपत्रक बनवू नये. तसेच, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केवळ कार्यालयात बसून त्यावर सही करू नये, अशा शब्दांत आयुक्त श्री. बांगर यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. अंदाजपत्रकातील बाबी आणि प्रत्यक्ष स्थिती याच्यात तफावत आढळली तर त्याची जबाबदारी निश्चित केली जाईल, असेही आयुक्त श्री. बांगर यांनी स्पष्ट केले.
कला दालनाची पाहणी
माजिवडा येथील ठाणे कला दालनाची पाहणी ही आयुक्त श्री. बांगर यांनी केली. २०१९ पासून बंद असलेल्या या दालनाची दुरावस्था झाली आहे. गळतीमुळे सर्वाधिक नुकसान झालेले आहे. त्यामुळे आधी या गळतीचा बंदोबस्त करावा. त्यानंतर या कला दालनाचे रुप कसे बदलता येईल यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेवू, असे आयुक्त श्री. बांगर यांनी स्पष्ट केले.
या पाहणी दौऱ्यात उपनगर अभियंता रामदास शिंदे, क्रीडा अधिकारी मीनल पालांडे, कार्यकारी अभियंता संजय कदम, प्रशांत पाठक आदी उपस्थित होते.