भाजपा आणि महायुती लोकसभेच्या ४५, विधानसभेच्या २०० पेक्षा अधिक जागा जिंकेल
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास
मुंबई
भारतीय जनता पार्टी आणि महायुती लोकसभेच्या 45 पेक्षा अधिक आणि विधानसभेच्या 200 पेक्षा अधिक जागा जिंकेल असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी व्यक्त केला. भिवंडी (जि.ठाणे) येथे प्रदेश भाजपातर्फे आयोजित महाविजय 24 कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत श्री.बावनकुळे बोलत होते. प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, ठाणे शहर अध्यक्ष आ.निरंजन डावखरे यावेळी उपस्थित होते. मोदी सरकारची विकास कामे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार या तीन नेत्यांच्या दूरदृष्टीचा फायदा होऊन महायुती ऐतिहासिक विजय प्राप्त करेल असे त्यांनी नमूद केले.
श्री. बावनकुळे म्हणाले की, भाजपा महाराष्ट्रात क्रमांक एकचा पक्ष आहे आणि यापुढेही राहील. पार्लमेंट ते पंचायत स्तरापर्यंत आम्ही झटून काम करू. येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये भाजपा अव्वल कामगीरी करेल. विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये भाजपाला ज्या जागा मिळतील त्यापैकी 80 टक्के जागांवर म्हणजे 152 जागांवर भाजपा विजयी होईल असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला. महाराष्ट्राला विकासाच्या दृष्टीने पहिल्या क्रमांकावर घेऊन जाण्यासाठी, विकासात्मक बाबी लक्षात घेऊन नियोजनबद्धरित्या भाजपा ताकदीने काम करेल अशी ग्वाही त्यांनी दिली.
ते म्हणाले की, घर चलो अभियानाच्या माध्यमातून राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या योजना प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणार आहोत. आगामी निवडणुकांसाठी भाजपाची यंत्रणा युद्धस्तरावर कामाला लागली असून कामांचा आढावा घेण्यासाठी २८८ वॉररुम्स तयार आहेत. भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश व्हावेत यासाठी योजना तयार करण्यात आली आहे .
प्रदेश भाजपातर्फे आयोजित ‘महाविजय 2024’ कार्यशाळेचे उदघाट्न प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय सरचिटणीस आणि राज्याचे प्रभारी सी.टी.रवी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. केंद्रीय लघु, मध्यम व सूक्ष्म उद्योग मंत्री नारायण राणे, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, वैद्यकीय शिक्षण व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, मुंबई अध्यक्ष आ. आशीष शेलार, ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ. किसन कथोरे आदी यावेळी उपस्थित होते. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी प्रास्ताविक केले.