कृषी दिनानिमित्त शेतकरी सन्मान सोहळा
विजय कुमार यादव
जिल्हा परिषद ठाणे
दि. १ जुलै २०२३
महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल त्यांच्या जन्मदिनी अभिवादन करून ठाणे जिल्हा परिषद तर्फे कृषी दिन व कृषी संजीवनी मोहिम सप्ताह समारोप समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी आणि उत्तम दर्जाचे पीक घेऊन जिल्ह्यात एक वेगळा आदर्श निर्माण करणाऱ्या शेतकऱ्यांची दखल घेत त्यांचा सन्मान करण्यात आला.
शेतकऱ्यांच्या विविध योजनांची माहिती तसेच पर्यटन क्षेत्रातील विकासाची दिशा वाढावी म्हणून माहितीपर घडी पत्रिका प्रकाशन मा. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रुपाली सातपुते यांच्या हस्ते झाले.
यावेळी प्रगतशील शेतकऱ्यांचे कौतुक करत जिल्हा परिषद ठाणे तर्फे आयोजित या सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने ‘शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत योजनांचा पुरेपूर वापर करून घ्यावा.’ असे आवाहन मा. विभागीय कृषी सहसंचालक कोकण विभाग, डॉ अंकूश माने यांनी केले.
‘शेतकरी महिलांच्या घरी भेट देण्यासाठी जेव्हा गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं हे घर मी माझ्या कष्टाने उभं केलं. महिला शेतकरी विविध योजनाचा वापर करत पुढाकार घेत आहेत.’ असं म्हणत माने यांनी शेतकऱ्यांनी योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेत उत्पादन वाढवावं असं आवाहनही केलं.
आज ज्या शेतकऱ्यांनाचा सन्मान करण्यात आला त्यांचे खूप कौतुक. तसेच शेतकऱ्यांनी फळबाग लागवड व फुलं शेती करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दिपक कुटे यांनी केले.
‘कृषी दिनानिमित्त प्रथम सर्वांना खुप शुभेच्छा. गेल्या वर्षी १२ ठिकाणी उपसा सिंचन योजना राबविण्यात आली. पडीक जमिनीवर शेतकरी भाजीपाला पीक घेत आहेत. इ कार्ड योजना, मधुमक्षिका पालन व कृषी पर्यटन क्षेत्रात शेतकऱ्यांना भरारी घेण्यासाठी नावीन्यपूर्ण योजना यावर्षी राबविण्यात येणार आहे. यासाठी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक श्री मनुज जिंदल यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. आज कृषी दिनानिमित्त मला महिला शेतकऱ्यांचा सन्मान आज करण्यात आला याचा मला आनंद आहे. शेती क्षेत्रात महिलांनी यावं, योजनांचा लाभ घ्यावा उत्पन्न वाढवत आर्थिक प्रगती करावी.’ असे प्रतिपादन मा. कृषी विकास अधिकारी सारीका शेलार यांनी केले.
यावेळी कृषीतज्ञ डॉ. नामदेव म्हसकर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. भात पिकांवर आधारित एकात्मिक पीक पध्दती या विषयावर माहिती देताना त्यांनी सांगितले की ‘उत्पादन वाढविण्यासाठी वेगवेगळ्या मोहिम राबवायला हव्यात. ज्यावेळी आपण उपाययोजना आणि आपलं उत्पादन वाढतं त्यावेळी पैशाच्या स्वरूपात वाढ होण्यासाठीही आपण प्रयत्नशील व प्रगतशील असणे गरजेचे आहे. उत्पादन खर्च वाढला की उत्पादन कमी होते. अशावेळी शासकीय योजनांचे लाभ घेणे गरजेचे आहे.’
आपल्या रोजच्या आहारात तृणधान्य असायला हवं. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढाकार घेत तृणधान्य वाढीसाठी कार्य करावं असं आहारतज्ञ डॉ. महेश पाटील यांनी सांगितले. तसेच भात पिक लागवडीची SRT पद्धतीने शेती करण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले. SRT शेती संदर्भातील माहिती देताना सांगितले की, एका वर्षात भात शेती करण्यासाठी दहा हजार रुपये खर्च करून उत्पादन वाढीसाठी SRT पद्धतीने शेती करण्यात यावी असेही आवाहन त्यांनी केले.
शेतकऱ्यांचा संघर्ष वर्षानुवर्षे चालत आहे. पण आमच्याकडे कृषी विभागाकडून महत्त्वाचे सहकार्य लाभले आहे. शेतकरी आज आधुनिक शेती करतोय त्यामुळे उत्पादन वाढत आहे. म्हणूनच शिक्षण घेऊन नोकरी न करता मी शेती करतोय याचा मला अभिमान आहे. शेतकरी म्हणून आज सन्मानित केल्याबद्दल मी आभार मानतो – निलेश वाळिंबे, शेतकरी
या सगळ्यात मोलाचे योगदान देणारे व शेतकऱ्यांच्या मागे कायम भक्कम उभे राहणाऱ्या कृषी विभागातील अधिकाऱ्यांचाही यावेळी तुळशी रोपं देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रुपाली सातपुते, मा. विभागीय कृषि सहसंचालक, कोकण विभाग डॉ. अंकुश माने, मा. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दिपक कुटे, कृषी विकास अधिकारी सारीका शेलार, सचिन थोरवे, आहार तज्ञ डॉ. महेश पाटील, कृषी तज्ञ डॉ. नामदेव म्हसकर, तालुका स्तरावरील सर्व कृषी विकास अधिकारी, शेतकरी, अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.