जिल्ह्यातील प्रकल्पांना गती देणार
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
जळगाव जिल्ह्यातील निम्न तापी पाडळसे प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात येईल. बोदवड उपसा सिंचन योजनेचे बाकी राहिलेले २० टक्के काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल. जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांना गती देण्यात येईल. सिंचनासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, मागील वर्षभरात जिल्ह्यात २० हजार हेक्टर शेती क्षेत्रावर ठिंबक सिंचनाचा लाभ देण्यात आला. याचा २१ हजार शेतकऱ्यांना लाभ झाला. ५० हजार शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ देण्यात आला. १ हजार ट्रॅक्टर वाटप करण्यात आले. रस्ते कामांकरिता जिल्ह्याला अडीच हजार कोटींची मदत शासनाने केली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कांदा चाळ जळगाव जिल्ह्यात उभारण्यात आल्या. जलजीवन मिशनच्या १३५४ योजना जिल्ह्यात सुरू आहेत. फळबाग योजना व नैसर्गिक आपत्तीत जळगाव जिल्ह्याला भरघोस मदत करण्यात आल्याचेही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, शासनाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी ४७ कोटींची मदत दिली आहे. जलजीवन मिशनच्या १७६५ कोटींच्या योजना मंजूर करण्यात आल्या आहेत. मुक्ताईनगर मध्ये १८५ कोटींचा पूल मंजूर केला आहे. चोपडा पूला करिता १७५ कोटींची शासन मदत झाली आहे. सर्वसामान्यांच्या हितासाठी शासन योजना गतिमान पद्धतीने राबवित आहे.
वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन म्हणाले, शासनाने जिल्ह्यात मेहरूण येथे १२४ कोटींचे नवीन अद्यावत क्रीडा संकुल मंजूर केले आहे. अत्याधुनिक मेडिकल हब जिल्ह्यात सुरू करण्यात आले आहे. सर्वसामान्यांना शासकीय कार्यालयाच्या चकरा माराव्या लागू नये यासाठी ‘शासन आपल्या दारी’ लोकाभिमुख अभियान आणले आहे. यात दुर्गम, पाड्या-वस्त्यावरील लाभार्थ्यांला शासकीय योजनांचा लाभ घरबसल्या मिळत आहे.
यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत शासनाच्या विविध योजनांच्या १५ लाभार्थ्यांना व्यासपीठावर बसण्याची संधी मिळाली. यामध्ये लताबाई पाटील, शशिकांत कोळी, अथर्व साळुंखे, दिपक भिल, गोमा गायकवाड, नीता पाटील, हिलाल बिल, मधुकर धनगर, मोहिनी चौधरी, सोनी गवळे, दत्तात्रय महाजन, विजया देवरे, ज्ञानेश्वर आमले, कु. सायली शिरसाठ, मिलिंद निकम यांचा समावेश होता. यातील प्रातिनिधिक पाच लाभार्थ्यांचा लाभाचे प्रमाणपत्र व धनादेश देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हा वार्षिक योजनेतून यावेळी दहा रूग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी जळगाव जिल्ह्याने विविध योजनांच्या माध्यमातून दिलेल्या लाभांची माहिती देणारी दृकश्राव्य चित्रफित दाखविण्यात आली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे खान्देशी टोपी, रूमाल, केळीपासून तयार करण्यात आलेल्या विविध वस्तू, तृणधान्याचा संच व बहिणाबाईंच्या कवितांचे पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले. व्यासपीठावर याप्रसंगी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक बी. जी. शेखर पाटील, जिल्हाधिकारी अमन मित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया, पोलीस अधिक्षक एम. राजकुमार, महानगरपालिका आयुक्त विद्या गायकवाड आदी अधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी केले. तर उपस्थितांचे आभार मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ आशिया यांनी मानले.
यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कृषी आणि कामगार विभागाच्या लाभार्थीना कामगार किट, टॅक्टरचे वाटप करण्यात आले. जिल्ह्यातून आलेल्या सरपंचाशीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यासपीठावरून खाली येत प्रत्यक्ष संवाद साधला.