महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी इच्छुक उद्योजकांकडे पाठपुरावा करणार
- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई,
महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी परकीय उद्योजक इच्छुक आहेत. त्यांच्याबरोबर राज्य शासनाने विविध करार केले आहेत. त्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. आज विधान भवनात उद्योजकांसोबत बैठक घेण्यात आली. या बैठकीत या उद्योजकांसोबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
जपानच्या भेटी दरम्यान अनेक उद्योजकांनी महाराष्ट्रात येण्याची इच्छा व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर आज विविध उद्योजक आणि त्यांच्या संस्थांसोबत ही बैठक झाली. महाराष्ट्र शासनासोबत, उद्योग विभागामध्ये अनेक प्रकारचे करार उद्योजकांनी केलेले आहेत. महाराष्ट्रात उद्योग, अर्थ विकास आणि शेती विषयांत आणखी सुधारणा होण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.
राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध उद्योजकांना योग्य स्वरुपाची बाजारपेठ मिळावी यासाठी प्रयत्न करणे अत्यावश्यक असल्याचे यावेळी उद्योजक म्हणाले. उद्योगांना पायाभूत सुविधा मिळण्यासाठी राज्यात पोषक वातावरण तयार होत आहे. मात्र, ग्रामीण भागात मोबाईल कनेक्टीव्हिटी, दळण-वळणाच्या सुविधा, या सोबतच उद्योगांना पूरक सुविधा असाव्यात अशा स्वरूपाची मागणी करण्यात आली.
या सर्व विषयांचा राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. या बैठकीला उद्योजक इंडियन मर्चंट चेम्बर्सचे अनंत सिंघानिया, समीर सोमैय्या, महाराष्ट्र आर्थिक सामाजिक विकास परिषदेच्या शीतल पांचाळ, अमेरिका स्थित उद्योजक किशोर गोरे, सौरभ शहा आदी उपस्थित होते.
येत्या सप्टेंबर महिन्यात विदेशातील महिला धोरण याबाबत एक परिसंवाद घेण्यात येणार असल्याचे त्या म्हणाल्या. या परिसंवादाला काही देशांच्या प्रतिनिधींचा पाठिंबा असून यामध्ये सहभागी होण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे.