अन्न सुरक्षा मानांकनात महाराष्ट्र तिसरा’ जागतिक अन्न सुरक्षा दिवशी पुरस्काराने सन्मानित
अन्न सुरक्षा मानांकनात महाराष्ट्र तिसरा’ जागतिक अन्न सुरक्षा दिवशी पुरस्काराने सन्मानित
अन्न सुरक्षेच्या बाबतीत राज्याचे उत्तम कामगिरी केली असून आज जागतिक अन्न सुरक्षा दिनी तिसऱ्या क्रमांकाचे मानांकन मिळाल्याबद्दल राज्याला सन्मानित करण्यात आले आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या या कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या हस्ते अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त परिमल सिंह यांनी हा पुरस्कार स्विकारला. विभागाला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी अभिनंदन केले आहे.
राज्याने ‘इट राईट’ या उपक्रमातही उत्तम कामगिरी केली आहे. या उपक्रमाअंतर्गत राज्यातील अकरा जिल्ह्यांना पुरस्कृत करण्यात आले आहे. यात बृहन्मुंबई, पुणे, मिरा भाईंदर महानगरपालिका, नवी मुंबई, ठाणे, सोलापूर, वर्धा, औरंगाबाद, लातूर आणि नाशिक या जिल्ह्यांचा समावेश आहे.
खाद्य सुरक्षेसंदर्भात अन्न व औषध प्रशासनामार्फत विविध उपाय योजना केल्या जातात. यात खाद्य परवाने, टेस्टींग सुविधा, प्रशिक्षण आणि ग्राहकाच्या हितासाठी केलेल्या कामांच्या आधारावर हे मानांकन (FSSAI) अन्नसुरक्षा व मानके प्राधिकरणातर्फे दिले जाते. राज्याने गेल्या वर्षभरात नियोजनबद्ध आखणी करत उत्तम कामगिरी केली आहे. गेल्या वर्षी पंधराव्या क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्र राज्याने यावर्षी सरळ तिसरे स्थान पटकावले आहे.
मोठ्या वीस राज्यांच्या स्पर्धेत तमिळनाडूने पहिला, गुजरात दुसरा तर महाराष्ट्राने तिसरा क्रमांक मिळविला आहे. हे मानांकन देत असतांना राज्याने केलेली पदभरती, परवाने वितरण, अनुपालन, हेल्प डेस्क, आणि खाद्य विक्रेत्यांच्या तपासणीची संख्या याचाही विचार केला गेला. हे मानांकन देण्यासाठी समिती नेमण्यात आली होती ज्यात खाद्य तपासणी तज्ज्ञ, पोषण आहार तज्ज्ञ यांच्यासह इतर मान्यवरांचा समावेश होता.
नवी दिल्ली येथे झालेल्या या कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण, अन्नसुरक्षा व मानके प्राधिकरण (FSSAI) चे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण सिंघल उपस्थित होते. मोठी वीस राज्य, छोटी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील विजेत्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर आयुष आहार या उपक्रमाच्या ‘लोगो’ चे अनावरण आणि माहितीपर पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी मान्यवरांची समयोचित भाषणे झाली.