महात्मा गांधी रुग्णालय समस्याबाबत कार्यवाही करणार – मंत्री राजेश टोपे
महात्मा गांधी रुग्णालय समस्याबाबत कार्यवाही करणार - मंत्री राजेश टोपे
महात्मा गांधी रुग्णालयातील रिक्त जागा तत्काळ भरण्यात याव्यात. यासाठी केंद्र सरकारच्या जेम पोर्टल वरुन मनुष्यबळ घ्यावे. रुग्णालयातील अर्धवट बांधकाम पूर्ण करावे. रुग्णालयातील स्वच्छता ठेवावी. त्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री खरेदी करावी, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिल्या.
परळ येथील महात्मा गांधी स्मृती रुग्णालयाच्या विविध प्रकारच्या समस्यांबाबत तोडगा काढण्यासाठी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे पुढील आठवड्यात व्यापक बैठक घेणार आहेत.
याबाबत आज सह्याद्री अतिथी गृहात रुग्णालयाच्या समस्यांबाबत बैठक झाली. आमदार अजय चौधरी, नगरसेवक अनिल कोकीळ, केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत, सहाय्यक अधिष्ठाता डॉ. प्रविण बांगर, आरोग्य विभागाचे सहसचिव वि. ल. लहाने, अवर सचिव महेश लाड आदी उपस्थित होते.
आमदार अजय चौधरी यांनी महात्मा गांधी स्मृती रुग्णालयातील विविध प्रकारच्या समस्यांबाबत माहिती दिली. रुग्णालयातील व्यवस्था पूर्णपणे कार्यान्वित करण्याची आवश्यकता आहे, असे सांगितले.
यावेळी ईएसआयसीचे डॉ. संजय ढवळे, डॉ. राजीव गुरमुखानी, संचालक महेश वरुडकर, कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी बाळा कदम उपस्थित होते.