पर्यावरण संवर्धनात प्रत्येकाने सहभाग घ्यावा – पर्यावरण प्रधान सचिव प्रवीण दराडे
सिंगल युज प्लास्टिकला पर्यायी वस्तूंचे मंत्रालयात प्रदर्शन
मुंबई,
सिंगल युज प्लास्टिकला सशक्त पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे सिंगल युज प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करून पर्यावरण संवर्धनात प्रत्येकाने मोलाची भूमिका बजावली पाहिजे, असे प्रतिपादन पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी केले.
22 एप्रिल हा दिवस जागतिक वसुधंरा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून 20 व 21 एप्रिल 2023 रोजी पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सिंगल युज प्लास्टिकला पर्यायी वस्तूंचे प्रदर्शन मंत्रालयाच्या त्रिमुर्ती प्रांगणात भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन श्री.दराडे यांच्या हस्ते झाले. यावेळी विभागाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सिंगल युज प्लास्टिकच्या वापराला पूर्णपणे बंदी जाहीर झाल्यानंतर त्याला पर्यायी वस्तूंचे उत्पादन मोठ्या प्रमाणात तयार होऊ लागले आहे. परंतू सिंगल युज प्लास्टिकला सक्षम पर्यायी वस्तू उपलब्ध होऊ शकतात याबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये व्यापक जागृती करण्याच्या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.