चैत्यभूमी येथे येणाऱ्या अनुयायांना आवश्यक सुविधा पुरविण्याचे निर्देश
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पाहणी
मुंबई,
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी येथे मोठ्या संख्येने येणाऱ्या अनुयायींना आवश्यक त्या सोयी सुविधा पुरविण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाला देण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आज रात्री दादर येथील चैत्यभूमी येथे भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी महिला व बाल विकास, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, मुंबई महानगरपालिकेचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मुंबईसह राज्यात सर्वत्र साजरी होणार आहे. यानिमित्त चैत्यभूमीवर मोठया संख्येने अनुयायी येतात. या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. तसेच इंदू मिल येथे साकारण्यात येणाऱ्या स्मारकाचा कामाला गती देण्याचे ही निर्देश दिले आहेत. जागतिक दर्जाचे स्मारक तयार होईल, असेही त्यांनी सांगितले.