मुंबईतील एमयुटीपी प्रकल्पांसाठी राज्य शासनाचे पूर्ण सहकार्य
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई,
मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टस (एमयुटीपी) हे मुंबई महागनर (एमएमआर) क्षेत्रातील नागरिकांच्या सुविधेच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. या प्रकल्पांसाठी राज्य सरकार पूर्ण सहकार्य करेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. हे प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत, यासाठी राज्य शासनाच्या संबंधित सर्व यंत्रणांनी भू-संपादन, पुनर्वसन यांसह आर्थिक सहभागाच्या अनुषंगाने प्राधान्याने कार्यवाही करावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी हे सर्व प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण व्हावेत, यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देशीत करुन एमएमआरडीएसह अन्य यंत्रणांच्या वित्तीय तसेच करार आदी बाबींवर वेळेत कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
मुंबई रेल्वे विकास कार्पोरेशन (एमआरव्हिसी)च्यावतीने मुंबईत सुरु असलेल्या मुंबई नागरी परिवहन प्रकल्पांबाबत (अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टस – एमयुटीपी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे सादरीकरण करण्यात आले.
रेल्वेच्या जमिनीवरील अतिक्रमण, झोपडपट्ट्या हटवण्यासाठी रेल्वेने पुढाकार घ्यावा. झोपडपट्टी विकास प्राधिकरण (एसआरए)प्रमाणेच एक नियोजन प्रणाली राबवण्यात यावी. जेणेकरून मोठ्या प्रमाणात रेल्वेला जमीन उपलब्ध होईल. तसेच अशा रहिवाशांचे सुयोग्य पुनर्वसनही शक्य होईल. यासाठी राज्य शासन आवश्यक ते सहकार्य करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिली.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, एमयुटीपीचे हे प्रकल्प मुंबई (एमएमआर) क्षेत्रातील नागरिकांच्या वाहतूक सुविधेच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहेत. त्यामुळे एमएमआरडीसोबतच अन्य यंत्रणांनी हे प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत, यासाठी पूर्ण सहकार्य करणे आवश्यक आहे. आवश्यकता भासल्यास एमएमआरडीएला या प्रकल्पांसाठी आर्थिक वाटा उचलता यावा, यासाठी कर्जाची व्याप्तीही वाढवली जाईल. रेल्वे मंत्रालयाशीही पत्रव्यवहार केला जाईल. हे सर्व प्रकल्प एकाच पद्धतीने आणि सुनियोजितपणे वेळेत पूर्ण व्हावेत यासाठी प्रयत्न केले जातील. भू-संपादन आणि पुनवर्सनाबाबतही स्थानिकांना विश्वासात घेऊन कार्यवाही करावी. बाधितांना आहे त्या ठिकाणीच पुनर्वसनाचा पर्याय उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, लोकांसाठी हे प्रकल्प खूप फायेदशीर ठरले आहेत. यापूर्वीच हे प्रकल्प वेगाने आणि वेळेत पूर्ण होणे अपेक्षित होते. त्यामुळे आता या प्रकल्पांना कालबद्ध पद्धतीने वेग दिला पाहिजे. वित्त पुरवठ्यासह, करार आदी बाबींची कार्यवाही तातडीने करण्यात यावी. विकास कामे वेळेत आणि वेगाने पूर्ण झाली पाहिजेत, यासाठी सर्वच यंत्रणांनी समन्वयाने काम करावे लागेल.