Uncategorizedबातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईलव्हिडीओ
Trending

डबल इंजिन सरकारच्यामागे महाशक्ती उभी पण सरकार राज्याचा कारभार हाकण्यात कमी पडत आहे

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा घणाघात

मुंबई

दि. १७ मार्च –

डबल इंजिन सरकारच्या मागे महाशक्ती उभी आहे, जाहिरातबाजी दमदार आहे मात्र सरकार राज्याचा कारभार हाकण्यात कमी पडत आहे हे आकडेवारीतून दिसतंय. अनेक योजनांमध्ये लाभार्थ्यांची संख्या कमी झालेली दिसते आहे. मग हे सरकार गतिमान कसे? असा प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शिंदेसरकारचा खरपूस समाचार घेतला.

आज विधानसभेत आरोग्य व ग्रामविकास विभागाच्या अनुदान मागणीवरील चर्चेत जयंत पाटील सहभागी झाले होते.

सार्वजनिक आरोग्य विभागात पायभूत सुविधांचा अभाव असतानाही निधीत तब्बल ७ टक्क्यांनी घट झालेली आहे. कुष्ठरोग, टीबी यासारखे आजार असलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. मात्र त्यामानाने तरतूद वाढलेली नाही असे निरीक्षण जयंत पाटील यांनी यावेळी नोंदवले.

पंचायत राज्य संस्थांना घटनात्मक दर्जा प्राप्त व्हावा यासाठी ७३वी घटना दुरुस्ती करण्यात आली. या घटना दुरुस्तीमुळे राज्यसरकार आता पंचायत राज्य संस्थांच्या बाबतीत पूर्वीप्रमाणे हस्तक्षेप करू शकत नाहीत. पाच वर्षांच्या कालावधीनंतर निवडणुका होणे बंधनकारक आहे. मग रामराज्य आलेले असतानाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी सरकार का घाबरत आहे? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलल्या जात आहेत? असा रोखठोक सवाल करत घटनेची पायमल्ली करणार्‍या सरकारचे सभागृहात वाभाडे काढले.

अर्थसंकल्पात पायाभूत महामंडळे स्थापन करण्याची घोषणा एका ओळीत केलेली आहे. त्याचे नेमके स्पष्टीकरण द्यावे. या निर्णयाने आपण स्थानिक स्वराज्य संस्थांकडे असलेले अधिकार काढू पहात आहे का? असा प्रश्न स्थानिक लोकप्रतिनधींना पडतो आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

 

सांगलीचा पालकमंत्री असताना जिल्ह्यातील ६७ प्राथमिक आरोग्य केंद्रे ही स्मार्ट व्हावीत यादृष्टीने आम्ही पावले उचलली. भौतिक सुविधा वाढवल्या. शंभर टक्के पदभरती केली. नियोजनामध्ये सुसूत्रता यावी यासाठी एका ॲपची निर्मिती केली. त्याच धर्तीवर मॉडेल स्कूल ही संकल्पना आम्ही राबवतो आहोत. शैक्षणिक आणि भौतिक सुविधा वाढवून गुणवत्तापूर्ण शाळा निर्माण करत आहोत. या उपक्रमात लोकसहभाग हा अभूतपूर्व आहे. शिक्षकांना योग्य प्रशिक्षण देण्यात आले आहे. पालकही यात आवर्जून सहभाग घेत आहेत. सहा महिन्यानंतर केलेल्या सर्वेत १५ टक्के गुणवत्ता वाढल्याचे दिसून आले आहे अशी माहितीही जयंत पाटील यांनी सभागृहाला दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button