ऐरणीवरचे प्रश्न सोडून विरोधकांना माफ केल्याच्या वल्गना करुन भाजप नेत्याचा नैतिकतेचा उच्चांक गाठण्याचा प्रयत्न – महेश तपासे
मुंबई
दि. ८ मार्च –
मागील दोन महिन्यात मराठवाड्यातील १३५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे, त्यांचा काय दोष होता? ते विद्यमान सरकारला माफ करतील का ? मात्र हे ऐरणीवरचे प्रश्न सोडून विरोधकांना माफ केल्याच्या वल्गना करत भाजपाच्या नेत्याने नैतिकतेचा उच्चांक गाठण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.
दरम्यान लवकरच स्थानिकसह सार्वत्रिक निवडणुकाही होतील, त्यात जनता कोणाला माफ करते, व कोणाला सजा देते हे लवकरच स्पष्ट होईल असा स्पष्ट इशाराही महेश तपासे यांनी दिला.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘होळीनिमित्त आम्ही सर्व विरोधकांना माफ केले’, असे गमतीशीर विधान केले. आता नेमकं कोणी कुणाला माफ करायला हवे हा खरा प्रश्न आहे असेही महेश तपासे म्हणाले.
शिंदे सरकारच्या संदर्भात संविधानिक पेच निर्माण झाला आहे, ज्याची सुनावणी अंतिम टप्प्यात आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीचे सुरळीत सुरू असलेल्या सरकारमधील आमदार फोडून ते सरकार पाडण्यात आले, ही कृती माफीला पात्र आहे का? असा प्रश्नही महेश तपासे यांनी उपस्थित केला.