शेतकऱ्यांची ‘जगावे की मरावे’ अशी परिस्थिती; शेतकऱ्यांना काय मदत देणार आहे हे तात्काळ जाहीर करा – अजित पवार
सरकार रंगाची होळी खेळत असताना त्यावेळी शेतकऱ्यांच्या पिकांची होळी होत होती - छगन भुजबळ
मुंबई
दि. ८ मार्च –
अवकाळीने ‘जगावे की मरावे’ अशी परिस्थिती शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली आहे त्यामुळे सरकार शेतकऱ्यांना काय मदत देणार आहे हे तात्काळ जाहीर करावे अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृह सुरू होताच केली.
सरकार तातडीने मदत काय करणार, केंद्रसरकारचे पथक कधी येणार आहे असा सवालही अजित पवार यांनी केला.
मंगळवारी सरकार रंगाची होळी खेळत होते त्यावेळी शेतकऱ्यांच्या पिकांची होळी होत होती अशा शब्दात आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सरकारवर हल्लाबोल करत नाराजी व्यक्त केली.
सरकार यावर ताबडतोब काय पाऊले उचलणार आहे हे सांगितले पाहिजे. शेतकरी कर्ज कसे फेडणार आहेत असा सवालही छगन भुजबळ यांनी यावेळी केला.
गेले तीन दिवस अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी अजित पवार आणि छगन भुजबळ यांनी सरकारला घेरल्याचे चित्र सभागृहात पाहायला मिळाले. त्यानंतर झालेल्या नुकसानीची आकडेवारी आणि अजून नुकसानीची आकडेवारी येत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली आणि याबाबत संध्याकाळपर्यंत सरकारचे म्हणणे मांडेल असे स्पष्ट केले.