शिवचरित्राचे महापर्व अनुभवायला शिवतीर्थावर या – भाजपा नेते आ. ॲड. आशिष शेलार
मुंबईकरांना जाणता राजा महानाट्य पाहण्याचा योग
मुंबई,
दि: 4 मार्च 2023
“जाणता राजा” च्या निमित्ताने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवचरित्राचे प्रेरणादायी महापर्व अनुभवायला शिवतीर्थावर या असे आव्हान मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी आज येथे केले.
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर भाजपातर्फे दहिहंडी, गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, शिवजयंती जल्लोषात साजरे करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर आमदार ॲड. आशिष शेलार यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आणि जीवनचरित्र सांगणारे, महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कल्पकतेतून साकारलेले ‘जाणता राजा’ या महानाट्याची सहा प्रयोगांची मालीका मंगळवार १४ मार्च ते रविवार १९ मार्च या कालावधीत रोज सायंकाळी ६:४५ वा. दादर येथील शिवाजी पार्क येथे आयोजित केली आहे.
या महानाट्याच्या विनामूल्य प्रवेशिका मुंबईतील दादर शिवाजी मंदिर, प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह बोरिवली, दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह विलेपार्ले, कालिदास नाट्यगृह मुलुंड आणि दामोदर नाट्यगृह परेल आदी ठिकाणी 9 मार्चपासून उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. रोज सुमारे 10 हजार प्रेक्षकांना हे महानाट्य पाहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या मालीकेचे शिर्षक प्रायोजक ‘सुगी’ हे नामवंत विकासक आहेत, तर भारतीय स्टेट बॅंक हे सह-शिर्षक प्रायोजक आहेत.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावरील सर्वात मोठे असे पाच मजली भव्य रंगमंचावरील हे ऐतिहासिक महानाट्य असून याची फिरता रंगमंच हे त्याचे खास आकर्षण आहे. तसेच आकर्षक प्रकाश योजना, याशिवाय, घोडे, बैलगाड्यांचा समावेश असणार आहे. महानाट्यामध्ये २५० हून अधिक कलाकार, नेत्रदीपक आतषबाजी आणि नवीन रंगमंचासहित शिवजन्म पूर्व काळ, शिवजन्म, शिवरायांचा न्याय निवाडा, रांझ्याच्या पाटलाला दिलेली शिक्षा, अफझलखान वध, सुरत छापा, शाहिस्तेखानाची फजिती, आग्र्याहून सुटका आणि रोमहर्षक राज्यभिषेक सोहळा अशा अनेक प्रसंगांचे सादरीकरण केले जाणार आहे असेही आ. ॲड. आशिष शेलार यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
इतिहासात पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने आग्रा किल्ल्यावर साजरा झाला. भारतीय नौदलाचा नवं चिन्ह छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरित होऊन तयार करण्यात आलं आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात प्रतापगडावरील अफजल खान थडग्याभोवतीचे अतिक्रमण हटवण्याचे काम झाले आहे. छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन भाजपा सदैव छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर वाटचाल करते आहे. नव्या पिढी पर्यंत महाराजांचे महान कार्य पोहचविण्याचा हा आमचा प्रयत्न असून हा प्रयोग म्हणजे मुंबईकरांना प्रेरणा देणाराच ठरेल असा विश्वास यावेळी आशिष शेलार यांनी व्यक्त केला.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र हे विलक्षण प्रेरणादायी आहे म्हणूनच सर्व मुंबईकरांनी शिवचरित्र अनुभवण्यासाठी जाणता राजा महानाट्य पाहण्याचा आनंद घ्यावा असे आवाहन भाजपा नेते आ. ॲड. आशिष शेलार यांनी केले.
या पत्रकार परिषदेला महाराजा प्रतिष्ठानचे विश्वस्त श्रीनिवास वीरकर सुगीचे प्रसन्न कर्णिक आणि एसबीआयचे प्रकाशचंद्र बरोड आधी उपस्थित होते