कृषी प्रदर्शनात चक्क दीड टन वजनाचा अन् एक कोटीचा महागडा गजेंद्र रेडा
कृषी प्रदर्शनात चक्क दीड टन वजनाचा अन् एक कोटीचा महागडा गजेंद्र रेडा
एखादा रेडा दीड टन वजनाचा असू शकतो. त्याला दररोज दोन हजार रुपये लागतात आणि किंमत एक कोटी. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. पण हे खरे आहे. सोलापुरात राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं खास सोलापूरकरांसाठी हा रेडा भेटीला आला आहे आणि लोकांना तो पाहण्यासाठी आणि त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी धांदल उडाली आहे.
कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील मंगसुळीच्या विलास गणपती नाईक या हौशी पशुपालकानं हा रेडा पाळला आहे. पशुपालन हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्याकडे १५ म्हशींचे पालन केले जाते. पाच वर्षांपूर्वी विलास नाईक यांनी चक्क हरियाणात जाऊन एक मुरा जातीची म्हैस १ लाख ४० हजार रुपयांना खास पालनासाठी गावी आणली. तिच्यापासून या गजेंद्र रेड्याचा जन्म झाला. त्याला अगदी घरच्याप्रमाणे सारे नाईक कुटुंब सांभाळतात. त्याचा दिवसाचा खर्च दोन हजार रुपये आहे.
कुटुंबातील सदस्याप्रमाणे दररोज त्याची निगा राखली जाते. त्याचा हा रुबाब पाहून अनेकांनी त्याला दीड कोटी रुपयांना मागितला; मात्र नाईक यांनी ती किंमत अपेक्षेपेक्षा कमी वाटते.
या गजेंद्र रेड्यासाठी दिवसाकाठी दोन हजार रुपयांचा खर्च आहे. दिवसभरात २ किलो सफरचंद, १५ लिटर दूध. तीन किलो पेंड असे खाद्य लागते. त्याला प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी ५० हजार रुपये मानधन दिले आहे.
नाईक यानी हरियाणातून जी म्हैस आणली तिच्यापासून गजेंद्र रेड्याचा जन्म झाला. त्याच्या हरियाणात असलेल्या वडिलाच नाव युवराज असल्याच सांगत, महाराष्ट्र आणि कर्नाटकात या रेड्याला अनेक ठिकाणी निमंत्रण येतात. त्याला आतापर्यंत एक कोटीला मागणी आली आहे. मात्र,आपण याला हरियाणात जाऊन विकणार असून तेथे यापेक्षा अधिक किंमत मिळेल, अशी अपेक्षा विलास नाईक यांनी व्यक्त केली आहे.