भारतमहाराष्ट्रमुंबई

कला हे कालातीत, ईश्वराचे देणं असते – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

कला हे कालातीत, ईश्वराचे देणं असते - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई, काव्य, कला, शिल्पकला, चित्रकला या सर्व कला कालातीत गोष्टी असतात. देशात परचक्र आले असताना देखील आपल्या देशातील कला टिकून राहिल्या. ईश्वरी देणे असलेल्या कलेला कधी अंत नसतो. त्यामुळे ज्याला जी कला प्राप्त झाली आहे, तिचा त्या व्यक्तीने सर्वोत्तम विकास केला पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

राज्यपाल कोश्यारी यांनी नुकतेच बॉम्बे आर्ट सोसायटी मुंबई येथे ‘कला गुलदस्ता’ या निवडक कलाकारांच्या कलाकृतीच्या प्रदर्शनाचे उदघाटन केले, त्यावेळी ते बोलत होते.

कला उद्योजिका व व्हिडीओशॉट्स आर्टस् अँड एंटरटेनमेंटच्या संस्थापिका अंजली कौर अरोरा यांच्या पुढाकाराने या एक आठवड्याच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

पूर्वी कलेला राजाश्रय होता. आज कलेला लोकाश्रय आहे. आपल्या घरी भिंतीवर एखादी सुंदर कलाकृती असावी असे सामान्य माणसाला देखील वाटत असते, असे राज्यपालांनी सांगितले. कलाकारांनी स्वतः आशावादी असावे व लोकांना देखील जगण्याची नवी उमेद द्यावी असे राज्यपालांनी सांगितले.

..तर कलाकार पुनश्च अजंता – वेरूळ साकारतील : भगवान रामपुरे

यावेळी बोलताना ज्येष्ठ शिल्पकार भगवान रामपुरे यांनी पूर्वीप्रमाणे कलेला राजाश्रय मिळत नाही याबद्दल खंत व्यक्त केली. आजही कलाकारांना त्यांच्या उमेदीच्या काळात राजाश्रय मिळाला तर ते एखाद्या पहाडातून अजंता-वेरूळ सारखी अजरामर शिल्पे साकारतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशात उत्तमोत्तम कलाकार आजही आहेत. परंतु त्यांचेकडून काम करून घेणारे नाहीत, असे त्यांनी सांगितले

यावेळी राज्यपालांनी प्रदर्शनाची पाहणी केली व कलाकारांशी संवाद साधला. राज्यपालांच्या हस्ते यावेळी प्रदर्शनात सहभागी होत असलेले कलाकार वैशाली राजापूरकर, अभय विजय मसराम, राखी शहा व सकीना मंदसौरवाला यांचा सत्कार करण्यात आला.

ज्येष्ठ कलाकार सदाशिव कुलकर्णी, सहआयोजक नरेंद्र सिंग अरोरा, कलाकार व कलारसिक यावेळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button