जिल्ह्यात लम्पीने 1882 पशुधन दगावलेत; 930 गावे लम्पीच्या विळख्यात
जिल्ह्यात लम्पीने 1882 पशुधन दगावलेत; 930 गावे लम्पीच्या विळख्यात
अगोदरच अतिवृष्टीने अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना पशुधनांवरही लम्पी आजाराने पुन्हा संकटात टाकले आहे. अशातच जिल्हाभरात लम्पी आजाराने आतापर्यंत 930 गावांना विळखा घातला आहे. यात सुमारे 28 हजार 663 जनावरे बाधित झाली आहेत तर 1882 पशुधनाला मृत्यूने गाठले आहे. यामुळे संकटात सापडलेल्या 1882 पैकी 1405 पशुधन पालकांनाच शासनाची नुकसान भरपाई मिळाली आहे. मात्र, अजूनही 478 पशुपालकांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा आहे.
लम्पी आजाराने 14 तालुक्यांमधील विविध गावांमध्ये 18 नोव्हेंबरपर्यंत सुमारे 1 हजार 882 एवढे पशुधन दगावले आहे. यापैकी आतापर्यंत 1 हजार 405 पशुधनाची संबंधित पशुधन पालकांना 3 कोटी 25लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. लम्पी आजाराचा फैलाव होऊ नये, याकरिता पशुसंवर्धन विभागाचे डॉ. नितीन फुके यांच्यावर जिल्ह्यात निरीक्षक म्हणून पशुसंवर्धन आयुक्तालयाने जबाबदारी सोपविली आहे, याशिवाय पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. संजय कावरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांच्या नेतृत्वात लम्पीला रोखण्यासाठी खबरदारी घेतली जात आहे.
पशुपालकांची मदतीची मागणी
अंजनगाव सुर्जी येथील पशुपालक यांचे लम्पी आजाराने पाच पशुधन दगावली आहे. तर आणखी पाच दुधाळ जनावरे बाधित आहेत. शासनाकडून तत्काळ मदत मिळावी अशी मागणी रोशन बाळे यांनी केली आहे. तर अक्षय हाडोळे यांनी सांगितले की, अंजनगाव सुर्जी येथे लम्पिचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामध्ये आतापर्यंत पाच,सहा गायी दगावल्या आहेत. तसेच काही पशुधनावर लम्पिची लागण झाली आहे. यामध्ये दोन ते तीन पशुधन गंभीर आहेत. दगावलेल्या पशुधनांचा नोंद केली आहे. शासनाने तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पशुपालकांनी केली आहे.