महाराष्ट्र
Trending

ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीच्या ७२५ व्या वर्षानिमित्त राजभवन येथे अजानवृक्षाचे रोपण

वृक्षारोपण हे भारतीय संस्कृतीचे अविभाज्य अंग - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

भगवान श्रीकृष्णांनी संसाराला अश्वत्थ वृक्षाची उपमा दिली तर भगवान बुद्धांना बोधीवृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले होते. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी जवळ अजानवृक्ष आहे. आपल्या देशात तुळशीपासून तर वटवृक्षापर्यंत प्रत्येक झाडाला सांस्कृतिक महत्त्व आहे. वृक्षारोपण हे भारतीय संस्कृतीचे अविभाज्य अंग असून वृक्षारोपण ही लोकचळवळ होऊन त्याद्वारे पर्यावरण रक्षणाचे कार्य केले जावे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीच्या ७२५ व्या वर्षानिमित्त राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते सोमवारी (दि. ११) राजभवन येथे आध्यात्मिक व धार्मिक महत्त्व असलेल्या अजानवृक्षाचे रोपण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

पर्यावरण व जैवविविधता अध्ययन, संरक्षण व संवर्धन या क्षेत्रात कार्य करणाऱ्या ‘बायोस्फिअर्स’ या संस्थेतर्फे वृक्षारोपण तसेच पर्यावरण रक्षणासंबंधी संबंधी माहिती पत्रकांच्या प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

आपल्या देशात प्रत्येक झाडाचे सांस्कृतिक महत्व जाणून पूजा केली जात असे. यामागे शास्त्रशुद्ध चिंतन व दूरगामी विचार होता. परकीय आक्रमणाच्या काळात शास्त्रीय विचार मागे पडून केवळ रूढी उरल्या. त्यामुळे प्रत्येक झाडाचे शास्त्रीय महत्त्व समजून त्याचे वृक्षारोपण केले जावे, अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.

सिद्धवृक्ष गोरक्षवल्ली, शांभवी, योगवल्ली आदी नावांनी ओळखल्या जाणाऱ्या अजानवृक्षाचे राजभवन येथे रोपण केल्यामुळे त्याला राजाश्रय मिळाला, असे बायोस्फिअर्स संस्थेचे संस्थापक व पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. सचिन पुणेकर यांनी सांगितले. राज्यातील प्रत्येक विद्यापीठामध्ये अजानवृक्षाचे रोपण व्हावे व त्यामाध्यमातून नवी पिढी पर्यावरणाबाबत जागरूक व्हावी अशी अपेक्षा डॉ. पुणेकर यांनी व्यक्त केली.

संत ज्ञानेश्वर यांच्या समाधीवर असलेला अजानवृक्ष सर्वदूर पोहचवणे तसेच त्या माध्यमातून ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशानेबायोस्फिअर्स ही संस्था कार्य करीत असल्याची माहिती डॉ.पुणेकर यांनी दिली.

यावेळी राज्यपालांच्या हस्ते अजानवृक्ष व सुवर्ण पिंपळ या वृक्षांची शास्त्रीय माहिती देणाऱ्या माहितीपत्रांचे प्रकाशन करण्यात आले तसेच जलसंवर्धन व जलसाक्षरता या विषयावरील लघूपटाचे प्रदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाला आमदार मंगलप्रभात लोढा, ह.भ.प. माणिक महाराज मोरे, डॉ. रवींद्र जायभाये, डॉ. मोहन वामन, डॉ. शंकर लावरे, सुरेश वैद्य, शिवलिंग ढवलेश्वर, दिपक हरणे, दत्तात्रय गायकवाड, चंद्रकांत सहासने, आशिष तिवारी, जय जगताप, सुनील जंगम, निवेदिता जोशी, आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. लावरे यांनी सूत्रसंचालन केले, डॉ. जायभाये यांनी आभार मानले, डॉ. पुणेकर यांनी प्रास्ताविक केले तर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button