आठ दशकाहून अधिक काळ देश-विदेशातील रसिकांच्या मनावर अद्भूत स्वरांच्या जादूची भुरळ घालणार्या गानकोकिळा, स्वरमाऊली, भारतरत्न लतादीदी मंगेशकर यांच्या जीवनातील आठवणींचा झुंबर काळजाला टांगून त्यातील मधुर गीतांची अविट गोडी चाखण्याचा दुर्ग्धशर्करा योग पनवेलमध्ये जुळून आला आहे. शनिवारी (ता. ९) सायंकाळी ६ वाजता मिडल क्लास हौसिंग सोसायटीच्या मैदानावर ‘अखेरचा हा तुला दंडवत’, दीदींनी स्वर आणि सूरबद्ध केलेल्या मराठी-हिंदी गाण्यांची मैफिल सजणार आहे. त्याचा लाभ रसिक, श्रोते, चाहते आणि नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सांस्कृतिक क्षेत्राला नवे आयाम देत पनवेलकरांना मुंबई, पुणे, डोंबिवलीच्या धर्तीवर नव्या युगासोबत सांस्कृतिक ठेव्याची पर्वणी देत कांतीलाल प्रतिष्ठान रायगड आणि पनवेल संघर्ष समितीने परंपरागत उद्या शनिवारी (ता. ९) सायंकाळी ६ वाजता भारतरत्न लतादीदींना सांगितिक मैफिलीतून आदरांजली अर्पण करण्याचा प्रयत्न केला आहे. भावगंधर्व, पद्मश्री पंडित हृदयनाथ मंगेशकर हे लतादीदींच्या जीवनातील आठवणींचे आकाश मोकळं करणार आहेत. त्यांच्या अमृततुल्य स्वर आणि सूरातून उदयास आलेली हजारो गाणी लतादीदींनी गायली आहेत. तब्बल आठ दशकाहून अधिक काळ मराठीसह ३४ भाषांतील रसिकांना दैवी आवाजातून जखडून ठेवण्याची किमया दीदींनी केली आहे. त्या आवाजातील जादू, देवदत्त गंधाराची मोहिनी, गाण्यांची जन्मकथा आणि मंगेशकरांचे नक्षत्राचे देणं… सारं सारं काही पंडित हृदयनाथ मंगेशकर रसिकांना मायेच्या सावलीतून मोकळेपणे सांगणार आहेत.
तेव्हा समस्त पनवेलकरांच्या वतीने दीदींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अख्खं कुटूंब घेवून मिडल क्लासच्या मैदानावर आपली स्वारी येईलच, अशी खात्री आणि अपेक्षा आयोजक कांतीलाल कडू यांनी बाळगली आहे. या मैफिलीत आपल्या अविट गोडीच्या सुमधुर आवाजाने विभावरी आपटे-जोशी, मधुरा दातार, अमेय जोग, प्राची देवल आणि मनिषा निश्चल दीदींच्या गीतांची बरसात करून पनवेलच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणार आहेत. त्यांना वाद्यवृंदासाठी साथ देतील ते विवेक परांजपे, केदार पराजंपे, डॉ. राजेंद्र दूरकर, विशाल गंड्रत्रवार आणि ऋृतुराज कोरे. या कार्यक्रमाचे निवेदन आणि दीदींच्या आठवणींसह गाण्यातील बारकावे जाणून घेण्यासाठी पंडित हृदयनाथजी मंगेशकर यांच्याशी संवाद घालून आठवणींच्या आभाळाला भरून येण्यास प्रवृत्त करणार आहेत त्या ज्येष्ठ वृत्त निवेदिका स्मिता गवाणकर.
कार्यक्रम प्रतिष्ठानच्या परंपरेनुसार विनामुल्य आणि सर्वांसाठी खुले असणार आहे. तरी सर्वांनी आवर्जुन उपस्थित राहवे, अशी विनंती कांतीलाल कडू आणि सहकार्यांनी केली आहे.