बातम्यामुंबई
Trending

हायड्रोजन ऊर्जा क्षेत्राच्या विकासासाठी महाप्रित आणि स्टेनबीस यांच्यात सामंजस्य करार

हायड्रोजन ऊर्जा क्षेत्राच्या विकासासाठी महाप्रित आणि स्टेनबीस यांच्यात सामंजस्य करार

मुंबई

महाराष्ट्रात इंडो – जर्मन हायड्रोजन ऊर्जा उद्योग आणि तंत्रज्ञान विकास साधण्यासाठी महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या महात्मा फुले नविनीकरणीय उर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादीत (महाप्रित) कंपनीद्वारे स्टेनबीस सेंटर फॉर टेक्नॉलॉजी ट्रान्सफर इंडिया (2E नॉलेज व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडचे ​​एक युनिट) यांच्यात हैदराबाद येथे सामंजस्य करार करण्यात आला.
यावेळी, महाप्रितचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी, महाप्रितचे (प्रशासन) कार्यकारी संचालक, धनंजय कमलाकर, प्रशांत गेडाम, महाप्रितचे कार्यकारी संचालक (संचालन) सुनील जी पोटे, मुख्य महाव्यवस्थापक – इमर्जिंग टेक्नोलॉजी उमाकांत धामणकर, व्यवस्थापकीय संचालकांचे तांत्रिक सल्लगार विजय माहुलकर, स्टेनबीस सेंटर फॉर टेक्नॉलॉजी ट्रान्सफर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक विनीतकुमार गोयल आणि गिरीश अरलीकट्टी उपस्थित होते.
या करारामुळे भारतीय आणि जर्मन उद्योगांमध्ये हायड्रोजन ऊर्जा क्षेत्रासाठी आवश्यक तंत्रज्ञान विकास, हस्तांतरण, प्रशिक्षण आणि कौशल्य निर्मितीची प्रक्रिया सुलभ होईल. ग्रीन हायड्रोजनचा वापर अधिक प्रचलित व सुलभ व्हावा यासाठी राज्याला भारत व जर्मनीमधील स्टार्टअप्स, संशोधन आणि विकास संस्था यासह तज्ज्ञांचे सहकार्य मिळावे, हे महाप्रितचे मुख्य उद्दिष्ट आहे.
शाश्वत विकासासाठी एक स्वच्छ ऊर्जास्रोत म्हणून ग्रीन हायड्रोजन महत्त्वाची भूमिका बजावतो. ऊर्जा साठवण आणि शाश्वत वाहतूक क्षेत्राच्या परिवर्तनाला गती देण्यासाठी हायड्रोजन अतिशय महत्त्वाचा घटक आहे. एक अक्षय ऊर्जास्रोत, झिरो एमिशन वाहनांसाठी इंधन आणि उद्योगांसाठी आधारभूत सामग्री म्हणून हायड्रोजनचा वापर महत्त्वाचा आहे.
“महाप्रीतद्वारे विविध हरित हायड्रोजन प्रकल्पांचे नियोजन केले जात असून त्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान, प्रशिक्षण आणि तज्ज्ञांचे सहकार्य या सामंजस्य करारामुळे मिळणार आहे. स्टेनबीस कंपनीचा हायड्रोजन ऊर्जा क्षेत्रातील अनुभव आणि जर्मन तंत्रज्ञानाच्या मदतीने हरित हायड्रोजनची निर्मिती, त्याची साठवणूक आणि वाहतूक अधिक सुलभ होणार आहे. येत्या काळात महाप्रितद्वारे सुरु करण्यात येणाऱ्या या हरित हायड्रोजन प्रकल्पांमुळे महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या लाभार्थींसाठी रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध होतील.” असे श्री. श्रीमाळी यांनी यावेळी सांगितले.
“महाप्रितच्या सहकार्याने इलेक्ट्रोलायझर तंत्रज्ञान, हायड्रोजन तंत्रज्ञानाशी निगडित गतिज ऊर्जा पर्याय, बायोमेथेन/मिथेनॉल यांचा ऊर्जा स्त्रोत म्हणून वापर, घनकचरा प्रक्रियेतून सिंथेसिस गॅसची निर्मितीवर लक्ष केंद्रित करू. महाराष्ट्रात हायड्रोजन क्लस्टरचा विकास हे या सामंजस्य कराराचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे श्री. गोयल यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button