बातम्यामहाराष्ट्र
Trending

पशुवैद्यकांनी पशुपालकांकडे जावून जनावरांचे लसीकरण करावे – सचिन्द्र प्रताप सिंह

पशुवैद्यकांनी पशुपालकांकडे जावून जनावरांचे लसीकरण करावे - सचिन्द्र प्रताप सिंह

—————-
मुंबई
———————
शासकीय आणि खाजगी पशुवैद्यकांनी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने सुचविलेल्या सुधारित शिफारशीचा अवलंब करावा. लम्पी आजाराच्या नियंत्रणासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी पशुपालकांकडे जाऊन जनावरांचा औषधोपचार व लसीकरण करावे, असे निर्देश पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी दिले.
“लम्पी आजार केवळ गाई व बैलांना होत असून त्याचा मानवी आरोग्याला कोणताही धोका संभवत नाही. या रोगाबाबत समाज माध्यमांमधून अफवा पसरविल्या जात असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. हा रोग माशा, डास, गोचिड इ. कीटकांमार्फत पसरत असल्याने या आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी ग्रामपंचायत व नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी कीटनाशकांची फवारणी करावी, तसेच सर्व पशुपालकांमध्ये जनजागृती करावी, असे आवाहन श्री. सिंह यांनी सर्व पशुपालकांना केले आहे.
लम्पी आजारावरील उपयुक्त औषधांच्या उपलब्धतेसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत प्रत्येक जिल्ह्यासाठी रू. 1 कोटी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीमधून लम्पी नियंत्रणात्मक लसीकरणासाठी खासगी पशुवैद्यकीय व्यावसायिक, सेवादाता (व्हॅक्सीनेटर्स) व पशुवैद्यकीय महाविद्यालयातील आंतरवासिता (इटरन्स) यांना प्रती लसमात्रा रु. 5 प्रमाणे मानधन अनुज्ञेय करण्यात आले आहे. सर्व खासगी पशुवैद्यकीय व्यावसायीकांनी, सेवादात्यांनी, पशुसंवर्धन विभाग आणि महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठातील सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी स्वयंप्रेरणेने लसीकरण मोहिमेत सहभाग नोंदवावा. यासाठी त्यांनी संबंधीत जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयाशी संपर्क करावा. शासनाने खासगी पशुवैद्यकांना लम्पी आजाराच्या उपचारासाठी कोणतीही बंदी घातलेली नसल्याचे श्री सिंह यांनी सांगितले.
राज्यामध्ये दि. 10 ऑक्टोबर, 2022 अखेर 32 जिल्ह्यांमधील एकूण 2 हजार 404 गावांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण 76 हजार 927 बाधित पशुधनापैकी एकूण 43 हजार 92 पशुधन उपचाराद्वारे रोगमुक्त झाले आहे. उर्वरीत बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज अखेर एकूण 128.01 लाख लसमात्रा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामधून एकूण 121.81 लाख पशुधनाचे मोफत लसीकरण करण्यात आले आहे. जळगांव, धुळे, अकोला, कोल्हापूर, सांगली, वाशिम आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधील लसीकरण पूर्ण झाले आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेले लसीकरण यांच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात सुमारे 87.06% गोवंशीय पशुधनाचे लसीकरण झाले आहे.
महाराष्ट्रात दि. 10 ऑक्टोबर, 2022 पर्यंत एकूण 3 हजार 622 पशुधनाचा मृत्यू झाला आहे. पशुपालकांनी भीती बाळगण्याचे कारण नसले तरी त्यांनी आवश्यक खबरदारी घ्यावी. लम्पी रोगाचा उपचार लक्षणे दिसल्यानंतर वेळेतच सुरू झाल्यास, मृत्यूची शक्यता अत्यंत कमी असून बहुतांश पशु उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व पशुपालकांनी लम्पी आजाराच्या संभाव्य लक्षणांकडे बारकाईने लक्ष ठेवावे व त्वरित नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा, असे श्री. सिंह यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button