“गोपाल रत्न पुरस्कार -२०२२” करिता अर्ज करण्याचे आवाहन
“गोपाल रत्न पुरस्कार -२०२२” करिता अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई दि. ६ : केंद्र सरकारने “गोपाल रत्न पुरस्कार – २०२२” राष्ट्रीय पुरस्काराकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. पात्र पशुपालक, कृत्रिम रेतन तंत्रज्ञ, सहकारी संस्था, दूध उत्पादक कंपनी आणि शेतकरी उत्पादक संस्थांनी https://awards.gov.in ह्या संकेतस्थळावर दि. १० ऑक्टोबर, २०२२ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे.
गोपाल रत्न पुरस्कार – २०२२ पुरस्काराची तीन श्रेणीत विभागणी केली असून प्रत्येक श्रेणीमधून तीन याप्रमाणे एकूण नऊ पुरस्कार देण्यात येणार आहेत.
पहिल्या श्रेणीत गायींच्या 50 जाती आणि म्हशींच्या 17 जातींपैकी कोणत्याही मान्यताप्राप्त देशी जातीची देखभाल करणारे शेतकरी, पशुपालक पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र असतील.
दुसऱ्या श्रेणीत राज्य, केंद्रशासित प्रदेश, पशुधन विकास मंडळ, राज्य दूध महासंघ, स्वयंसेवी संस्था आणि इतर खासगी संस्थांचे कृत्रिम रेतन तंत्रज्ञ (AI Technicians) ज्यांनी किमान 90 दिवसांचे कृत्रिम रेतनाचे प्रशिक्षण घेतले आहे ते पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र असतील.
तिसऱ्या श्रेणीत सहकारी संस्था, दूध उत्पादक कंपनी (MPC), शेतकरी उत्पादक संस्था (FPO) गावपातळीवर स्थापन केलेल्या दुग्ध व्यवसायात गुंतलेली आणि सहकारी कायद्यांतर्गत नोंदणीकृत असलेली कंपनी जी दररोज किमान 100 लिटर दूध संकलन करते आणि जीचे किमान 50 शेतकरी सदस्य असून दूध उत्पादक सदस्य दुग्ध व्यवसायाशी संबंधित आहे ते याकरिता अर्ज करु शकतात.
प्रत्येक श्रेणीमध्ये प्रथम क्रमांकाकरिता 5 लाख रु., द्वितीय क्रमांकासाठी 3 लाख रु., तर तृतीय क्रमांकासाठी 2 लाख रु., गुणवत्ता प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे.