महाराष्ट्रमुंबई

Mumbai: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज, मतदानाचा टक्का वाढवावा – मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम

मतदार यादीत नाव नोंदणीची 19 ऑक्टोबरपर्यंत संधी

मुबंई: भारत निवडणूक आयोगाने दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यातील एकूण 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी एका टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. यासाठी यंत्रणा सज्ज असून मतदारांनी सक्रिय सहभाग घेत मतदानाचा टक्का वाढवावा, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस.चोक्कलिंगम यांनी येथे केले.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या कार्यक्रमा संदर्भात मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत श्री.चोक्कलिंगम बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.किरण कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी विजय राठोड उपस्थित होते.

अजूनही ज्यांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवलेले नाही त्यांना दि. 19 ऑक्टोबरपर्यंत नाव नोंदणी करण्याची संधी अद्याप उपलब्ध असून ऑफलाईन तसेच ऑनलाईन दोन्ही पद्धतीने मतदार आपले नाव मतदार यादीत नोंदवू शकता. निरंतर मतदार नोंदणीचा कार्यक्रम अद्याप सुरु आहे. त्यामुळे ज्या पात्र नागरिकांची अद्यापपर्यंत मतदार नोंदणी झालेली नाही, अशा नागरिकांकडून उमेदवारांचे नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या अंतिम दिनांकाच्या 10 दिवस अगोदरपर्यंत म्हणजेच दि. 19 ऑक्टोबर 2024 पर्यंत प्राप्त झालेले अर्ज क्र. 6 मतदार यादीमध्ये नोंद घेण्यासाठी विचारात घेण्यात येतील. तरी या संधीचा लाभ घेऊन सर्व पात्र नागरिकांनी मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करत मतदानाचा आपला हक्क आर्वजून बजावावा, असे आवाहन श्री.चोक्कलिंगम यांनी केले.

निवडणूक कार्यक्रमाची रुपरेषा

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सन 2024 ची अधिसूचना मंगळवार दि. 22 ऑक्टोबर 2024 रोजी राजपत्रात निर्गमित करण्यात येईल. तर नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम मुदत मंगळवार दिनांक 29 ऑक्टोबर 2024 रोजी पर्यंत आहे. नामनिर्देशन पत्रांची छाननी बुधवार दि. 30 ऑक्टोबर 2024 रोजी करण्यात येईल. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत सोमवार दि. 4 नोव्हेंबर 2024 रोजी पर्यंत आहे. बुधवार दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान घेण्यात येणार असून शनिवार दि. 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी करण्यात येईल. सोमवार दि. 25 नोव्हेंबर 2024 रोजी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल. त्याचप्रमाणे राज्यातील लोकसभेच्या 16 – नांदेड या एका लोकसभा मतदारसंघात सुद्धा पोटनिवडणूक घेण्यात येणार असल्याची माहिती श्री. चोक्कलिंगम यांनी यावेळी दिली.

एकूण 9 कोटी 63 लाख 69 हजार 410 मतदार

राज्यात दि. १५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत पुरुष मतदारांची संख्या ४ कोटी ९७ लाख ४० हजार ३०२ इतकी असून महिला मतदारांची संख्या ४ कोटी ६६ लाख २३ हजार ७७ इतकी तर तृतीय पंथी मतदारांची संख्या ६ हजार ३१ इतकी आहे. आतापर्यंत एकूण ९ कोटी ६३ लाख ६९ हजार ४१० मतदारांची नोंदणी झाली असून यामध्ये सन २०११ च्या जनगणनेनुसार १००० पुरुषांमागे ९२९ महिला (Gender Ratio) असे प्रमाण आहे. सन २०१९ मध्ये मतदार यादीतील महिलांचे प्रमाण 1 हजार पुरुषांमागे 925 इतके होते. यामध्ये वाढ होण्याच्यादृष्टीने महिलांच्या मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिम राबविण्यात आल्याने 2024 मध्ये या प्रमाणात 936 अशी लक्षणीय सुधारणा झाली आहे.

सध्याच्या मतदार यादीत १८-१९ वर्षे वयोगटामधील नव मतदारांची संख्या 20 लाख 93 हजार 206 एवढी आहे. याशिवाय 1 लाख 16 हजार 355 इतक्या सेनादलातील (Service Voters) मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. अद्ययावत मतदार यादीमध्ये 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांची संख्या 12 लाख 43 हजार 192 इतकी आहे. यापैकी इच्छुक मतदारांना टपाली मतपत्रिकेद्वारे गृह मतदानाची सुविधा उपलब्ध होऊ शकेल. मतदार यादीतील 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांपैकी 47 हजार 716 इतके मतदार 100 वर्षावरील आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button