महाराष्ट्रमुंबई

प्रगत तंत्रज्ञानातून झालेल्या अर्थ परिवर्तनाचे श्रेय मोदींचे अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचे प्रतिपादन

प्रगत तंत्रज्ञानातून झालेल्या अर्थ परिवर्तनाचे श्रेय मोदींचे अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचे प्रतिपादन

————————
श्रीश उपाध्याय/मुंबई
————————-

‘भारत १९४७ साली स्वतंत्र झाल्यानंतरही तत्कालीन सरकारने विदेशातील अर्थनीतीच्या आधारे आपली वाटचाल सुरु ठेवली होती. तसे न करता नेहरू सरकारने जर सबका साथ सबका विकास सबका विश्वास या मूलमंत्राचा स्वीकार करून मार्गक्रमण केले असते, तर भारत खूप लवकर आर्थिकदृष्ट्या संपन्न झाला असता. या मंत्राचा स्वीकार केल्यानेच आज भारत जागतिक पातळीवर सुदृढ बनला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिक पातळीवर पाचव्या स्थानापर्यंत पोहोचविण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सिंहाचा वाटा आहे. प्रगत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशात झालेल्या या आर्थिक परिवर्तनाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच जाते,’ असे गौरवोद्गार देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी पंतप्रधानांच्या बाबतीत काढले आहेत.गुरुवार, दि. १५ सप्टेंबर रोजी हिंदी विवेकच्या ‘स्व ७५ ग्रंथ’चा प्रकाशन सोहळा वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात पार पडला, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी केंद्रीय अर्थमंत्र्यांसह विवेक समूहाचे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर, हरिद्वार सन्यास आश्रमाचे महामंडलेश्वर स्वामी विश्वेश्वरानंद गिरी महाराज, मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. आशिष शेलार, पद्म पुरस्कार विजेते रज्जूभाई श्रॉफ, हिंदी विवेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल पेडणेकर,कारुळकर प्रतिष्ठानचे प्रशांत कारुळकर आणि शीतल कारुळकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. .

सीतारामन म्हणाल्या की, ‘भारताने स्वातंत्र्यानंतर अवलंबिलेली नीती एकप्रकारे विदेशातून आयात केलेली होती, त्यामुळे देशाला आर्थिक संपन्नतेकडे जाण्यासाठी इतकी वर्षे लागली. स्वातंत्र्यापासूनच जर भारताने ‘स्वत्वाच्या’ भावनेने प्रेरित होऊन वाटचाल केली असती तर कदाचित चित्र वेगळे राहिले असते. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर आम्ही देशात कनेक्टिव्हीटीसोबत दळणवळनाकडे अधिक लक्ष दिले. कारण देशाचे आर्थिक गणित बसवताना या दोन्ही बाबी खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. भारतीयांच्या खात्यात थेट पैसे जमा करण्याची योजना असो किंवा लाभार्थ्यांना प्रत्यक्ष फायदा पोहोचवणे असो या सर्व प्रगत तंत्रज्ञानाच्या मार्फत आर्थिक सुधारणा करण्यात मोदी सरकार यशस्वी झाले. युपीए सरकारच्या कार्यकाळात देशाची अर्थव्यवस्था विस्कळीत झाली होती, मात्र चुरगाळून टाकलेल्या अर्थव्यवस्थेत बदल करण्याची सुरुवात नरेंद्र मोदी यांनी केली. युपीए सरकारने बिघडलेल्या अर्थव्यवस्थेतून देशाला बाहेर काढण्यात आणि देशात मोठी अर्थक्रांती करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना आलेले यश त्यांचे निर्विवाद नेतृत्व सिद्ध करण्यास पुरेसे आहे,’ असे सीतारामन यांनी म्हटले आहे.

सबका साथ – विकास – विश्वाससोबत प्रयासही गरजेचे
‘सबका साथ सबका विकास सबका विश्वास या मूलमंत्राने भारत प्रगतीपथावर आहे. देशाचा अमृत महोत्सव साजरा करत असताना देश जागतिक पातळीवर पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनून समोर आला आहे. मात्र, येत्या काळात अर्थव्यवस्थेत आणखी मोठी झेप घेण्यासाठी सबका साथ सबका विकास सबका विश्वास सोबत सबका प्रयास देखील गरजेचे असून सर्वांच्या प्रयत्नांनी देश लवकरच ते उद्दिष्ट देखील साध्य करेल,’ असा विश्वास देखील सीतारामन यांनी व्यक्त केला.

उपस्थितांना मार्गदर्शन करताना विवेक समूहाचे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर म्हणाले की, ‘देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना एक गोष्ट स्पष्टपणे अधोरेखित झाली ती म्हणजे देशात लोकशाही भक्कम असून ती सफलतेने नांदते आहे. जगाचा अभ्यास केला तर अनेक देशांमध्ये सत्ता परिवर्तन होताना रक्तपात आणि हिंसाचाराच्या घटना घडल्याचे समोर आले होते. कम्युनिस्ट देशात रक्तपात झाला, अमेरिकेत सत्तांतर होताना हिंसेसह अनेक प्रकार घडले. मात्र, भारतात जेव्हा सत्तांतर होते तेव्हा ते लोकशाही मार्गानेच होते ही लोकशाही राष्ट्र म्हणून भारतासाठी नक्कीच मोठी बाब आहे. विविध संस्कृती आणि घटकांनी बनलेल्या देशात स्थिरता असण्याचे कारण देशातील सांस्कृतिक संचित आहे. देश स्वतंत्र झाल्यानंतर भारताला आणि हिंदूंना हिनवले जात होते. मात्र, त्याच भारताने जागतिक अर्थव्यवस्थेत घेतलेल्या भरारीमुळे येत्या काळात जगाला हिंदूंची ताकद काय ते कळल्याशिवाय राहणार नाही. मागील ८ वर्षात वैश्विक संरचनेत देशाचे महत्त्व वाढले आहे. सत्ता आणि शक्ती शोषण नाही तर पोषणासाठी हवी हा विचार देशात रुजला आहे,’ असे करंबेळकर यांनी यावेळी म्हटले.

आजचे सरकार लोकांप्रति समर्पित
‘भारताने मागील १२०० वर्षांत जे अनुभवले नव्हते त्याची अनुभूती आज मिळते आहे. २०१४ पूर्वी देशात चिंतेचे वातावरण होते. मात्र, २०१४ साली मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर त्यावर चिंतन झाले आणि देश पुन्हा एकदा पुनर्वैभवाकडे वाटचाल करतो आहे याचे समाधान आहे. मोदींचा पहिला शपथविधी आणि राम मंदिराचे भूमिपूजन अशा ऐतिहासिक क्षणांमध्ये साधू संतांना मिळालेला आदर नक्कीच उल्लेखनीय आहे. देशातील सरकार लोकांप्रती समर्पित असल्यामुळे देश विकासाच्या मार्गावर चालत आहे.
– महामंडलेश्वर स्वामी विश्वेश्वरानंद गिरी महाराज

पर्यावरण, परिचय आणि संस्कृतीच्या आधारे विकास आवश्यक
‘देशाच्या आर्थिक राजधानीचा म्हणावा तसा विकास झालेला नाही हे वास्तव आहे. इंग्रजांच्या सन १८८८ च्या नियमावरच मुंबईच्या विकासाची कल्पना सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आली आणि त्यानुसारच मुंबईत वाटचाल झाली. मागील सत्ताधाऱ्यांनी कधीही मुंबादेवी मंदिर आणि लगतच्या परिसराचा विचार केला नाही, मच्छिमार आगरी कोळ्यांनी मुंबईची रक्षा केली, मात्र त्यांच्या शिक्षणासाठी सुविधा मुंबईत नाहीत. टेक्स्टाईलबाबतीत संधी असूनही मुंबईत विशेष काही घडू शकले नाही. मुंबईसारख्या शहराचा विकास शैक्षणिक, पर्यावरण, परिचय आणि संस्कृती आधारावर होणे गरजेचे आहे. येत्या निवडणुकीत होणाऱ्या रणसंग्रामात मुंबईकरांनी स्वतः चा विकास साधण्याचा प्रयत्न करावा.’
– आ. आशिष शेलार, अध्यक्ष, मुंबई भाजप

या प्रसंगे दैनिक जागरण चे ब्यूरो चीफ ओमप्रकाश तिवारी, वित्त विशेषज्ञ सीए पंकज, पत्रकार विकास संघाचेअध्यक्ष आनंद मिश्रा, वरिष्ठ पत्रकार अजय सिंह, प्रवासी संदेश चे डिजिटल प्रमुख श्रीश उपाध्याय, विकलांग की पुकार चे कार्यकारी सम्पादक सरताज मेहदी, अखिलेश चौबे, अभिनेता मनोज जोशी, अमर शर्मा, करुणाशंकर उपाध्याय आदी गणमान्य उपस्थित होते

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button