Mumbai: कलम 4 ची अंमलबजावणी केल्यास माहिती अर्जात घट होईल- अनिल गलगली
"माहितीचा अधिकार दिन" बृहन्मुंबई महापालिका पी/दक्षिण विभाग कार्यालयाच्या वतीने आयोजित
मुंबई: माहितीचा अधिकार कायदा 2005 चे कलम 4 ची अंमलबजावणी केल्यास माहिती मागण्याच्या अर्जात घट होईल, असे स्पष्ट मत माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी व्यक्त केले. अर्जदार आणि अधिकारी यामध्ये सुसंवाद स्थापित झाल्यास सेवेमध्ये गुणवत्ता येईल असे गलगली म्हणाले.
“माहितीचा अधिकार दिन” बृहन्मुंबई महापालिका पी/दक्षिण विभाग कार्यालयाच्या वतीने गोरेगाव पश्चिम वॉर्ड कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली आणि माहिती अधिकार कार्यकर्ते तथा प्रशासकीय कामकाज सल्लागार शरद यादव यांनी विभागातील सर्व जनमाहिती अधिकारी तसेच सहाय्यक जनमाहिती अधिकारी यांना सविस्तर मार्गदर्शन तसेच माहितीचा अधिकारसंदर्भात वेळोवेळी झालेल्या न्यायनिर्णयांची उपस्थितांना माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन सहाय्यक आयुक्त संजय जाधव यांनी केले. माहिती अधिकार कायदा 2005 सोबत महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम, 2005 तसेच महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, 2005 यावर लक्ष केंद्रित केले तर अपील संख्येत घट होईल आणि खऱ्या अर्थाने मुंबई महापालिका पारदर्शक होईल, असे गलगली यांनी सरतेशेवटी नमूद केले.