Mumbai: माकपा नेते सिताराम येचुरींनी संसदेत तळागाळातील लोकांचे प्रश्न मांडले: नाना पटोले
महाविकास आघाडीची माकपा नेते सिताराम येचुरींना आदरांजली.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सिताराम युचेरी यांनी देशाचे संविधान व लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी लढा दिला. देशातील समविचारी पक्षांना एकत्र आणण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. २००४ साली युपीए सरकार स्थापन करण्यात त्यांनीही पुढाकार घेतला होता तसेच २०२४ साली इंडिया आघाडी स्थापन करण्यातही त्यांचे मोठे योगदान होते. अत्यंत अभ्यासू तसेच सामान्य जनतेसाठी लढणारे नेते होते. राज्यसभेचे सदस्य असताना त्यांनी सातत्याने तळागाळातील लोकांचे प्रश्न संसदेत मांडले, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
यशवंतराव चव्हाण सेंटर येथे माकपा नेते सिताराम येचुरी यांना महाविकास आघाडीच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार, शेकापचे नेते जयंत पाटील, माजी खासदार कुमार केतकर, हुसेन दलवाई, महात्मा गांधीजींचे पणतू तुषार गांधी, पॉलिट ब्युरो सदस्य अशोक ढवळे, सुभाष लांडे, शाम गोहिल, किशोर ढमाले, प्रकाश रेड्डी, प्रा. सुरेश नवले यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
नाना पटोले पुढे म्हणाले की, सिताराम येचुरी हे आमचे महाविद्यालयीन काळातले आदर्श होते. विद्यार्थी चळवळीपासून काम करत त्यांनी पक्षाच्या सरचिटणीस पदापर्यंत विविध पदे भूषवली. युपीए सरकारवेळी सर्व पक्षांना एकत्र ठेवण्याचे महत्वाचे काम त्यांनी केले. मोदी सरकारच्या धोरणांनाही त्यांनी कडाडून विरोध केला. सिताराम येचुरी यांच्या निधनाने फक्त मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचेच नुकसान झालेले नाही तर देशाचे नुकसान झाले आहे, अशी आदरांजली पटोले यांनी वाहिली.
यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार म्हणाले की, सिताराम येचुरी यांचा अतिशय हुशार व्यक्तीमत्व असा लौकिक होता, विद्यार्थी चळवळीत त्यांचे मोठे योगदान होते. जवाहरलाल नेहरु विद्यापीठात त्यांनी नेतृत्वाची एक फळी निर्माण केली. आंतरराष्ट्रीय पातळीवरचा त्यांचा अभ्यासही दांडगा होता. डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखाली युपीए सरकार असताना आघाडी एकजूट ठेवण्यासाठी सिताराम येचुरी यांनी परिकाष्ठा केली. सिताराम येचुरी हे सभ्य व सुसंस्कृत व्यक्तीमत्व होते. प्रागतिक विचार वाढवणे हीच सिताराम येचुरी यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे शरद पवार म्हणाले.