महाराष्ट्रमुंबई

फेक न्यूज पसरवून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणा-या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हे दाखल करा!

काँग्रेसची कुलाबा पोलीस स्थानकात तक्रार

कर्नाटकातील गणपती विसर्जनाबाबत फेक न्यूज पसरवून राज्यात धार्मिक तेढ निर्माण केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने केली आहे. यासंदर्भात कुलाबा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

कर्नाटकातील घटनेची सत्य माहिती

१३ सप्टेंबर रोजी बेंगलूरूच्या टाऊन हॉल परिसरात कोणतीही परवानगी न घेता विश्व हिंदू परिषदेने आंदोलन आयोजित केले होते. यावेळी आंदोलक गणपतीची मूर्ती घेऊन आंदोलन करत होते. आंदोलकांना ताब्यात घेताना मूर्तीला इजा होऊ नये म्हणून पोलिसांनी मूर्ती सुरक्षित ठेवली व आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी विधिवत पूजा अर्चना करून गणपतीबप्पाचे विसर्जन केले.
ही माहिती अनेक फॅक्ट चेक करणा-या वेबसाईट्स व राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांनी फॅक्ट चेकच्या माध्यमातून सार्वजनिक केली आहे.

पण राजकीय फायद्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात माध्यमांना प्रतिक्रिया देताना कर्नाटक सरकारने व पोलिसांनी गणपती उत्सव थांबवून गणपतीची मूर्ती जप्त केली असे धडधडीत असत्य विधान करून सणासुदीच्या काळात राज्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यासोबतच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या एक्स (ट्वीटर) हँडलवरून या संदर्भात चुकीची माहिती प्रसारित करून कर्नाटकच्या काँग्रेसला जबाबदार धरले.

तर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी या संदर्भात खोटी माहिती प्रसारित करून समाजात तेढ आणि धार्मिक तणाव निर्माण करण्याचा व सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई अशी मागणी करणारी लेखी तक्रार प्रदेश काँग्रेसच्या विधि विभागाचे अध्यक्ष अॅड. रविप्रकाश जाधव यांनी कुलाबा पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरिक्षकाकडे केली आहे.

निवडणुकीच्या तोंडावर राजकीय फायद्यासाठी सत्ताधारी पक्षाचे नेत्यांकडून सातत्याने फेक न्यूज आणि अफवा पसरवून राज्यात धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांचे हे कृत्य सामाजिक शांतता भंग करणारे आहे. पोलिसांनी यांची गंभीर दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button