महाराष्ट्रमुंबई

Mumbai: खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनाने काँग्रेसचा लढवय्या नेता हरपला: बाळासाहेब थोरात

गावचे सरपंच ते लोकसभेचे खासदार असा राजकीय प्रवास असणाऱ्या वसंतराव चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्याच्या समाजकारण, सहकार, शिक्षण, कृषी, अशा विविध क्षेत्रात योगदान देताना सामान्य माणसाकरता आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षातील जनसामान्यांचा आधारवड असलेला लढवय्या नेता हरपला असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करताना आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले की, खासदार चव्हाण यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखदायक आहे. वसंतराव चव्हाण यांनी सर्वांना सोबत घेत जिल्ह्याच्या विकासात मोठे योगदान दिले. गावचा सरपंच, बाजार समितीचे सभापती, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन ,विधान परिषद सदस्य, विधानसभा सदस्य, लोकसभा सदस्य अशी त्यांची कारकीर्द राहीली.

पुरोगामी विचार आणि काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहताना त्यांनी अत्यंत अडचणीच्या काळामध्ये लोकसभा लढवली. नांदेड मधील मोठमोठे नेते काँग्रेस सोडून गेले तेव्हा मात्र सर्वसामान्य माणसाला बरोबर घेऊन खिंड लढवणाऱ्या या लढवय्याने नांदेड मधून मोठा विजय मिळवला.

एक सुसंस्कृत व्यक्तिमत्व असलेल्या खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनाने सर्वसामान्यांसाठी सातत्याने संघर्ष करणारा काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत पाईक, आपला एक सहकारी आणि संघर्षशील लढवय्या नेता हरपला असून त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. या कठिण प्रसंगी आम्ही सर्वजण चव्हाण कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत असे थोरात म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button