Mumbai: लाडक्या बहिणीला विरोध करणार्या नेत्यांना रक्ताच्या बहिणीनं रक्षाबंधनच करू नये-भाजप प्रवक्ते राम कुलकर्णींचे आवाहन
अंबाजोगाई(प्रतिनिधी)-राज्यातील माता-भगिनींच्या कल्याणासाठी राज्य सरकारने लाडकी बहिण योजना हाती घेतल्यानंतर विरोधकांनी खालच्या पातळीवर जावुन सुरू केलेला विरोध खर्या अर्थाने सामाजिकदृष्ट्या घाणेरडा म्हणावा लागेल. शरदचंद्र पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्यासह बगलबच्यांनी योजनेची थट्टा करणं खर्या अर्थाने रक्षाबंधनाच्या पार्श्वभुमीवर बहिणीचा अपमान करण्यासारखं होय. लाडक्या बहिण योजनेच्या माध्यमातुन वर्तमान सामाजिक स्थितीत रक्ताच्या नात्यातील बहिण भावाच्या नात्यात वाढलेली गोडी ज्याचं स्वागत घराघरात होत असताना या श्रेष्ठ नात्याचंही भान न ठेवता केवळ राजकिय स्वार्थापोटी योजनेच्या आडुन सुरू केलेली आरडाओरड बिनडोकपणाचे लक्षण असुन उद्याच्या रक्षाबंधनाच्या दिवशी अशा खोडीत नेत्यांच्या रक्ताच्या बहिणींनी देखील त्यांना रक्षाबंधन करता कामा नये असे आवाहन भाजपाचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केले.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, सरकारने एखादा जनहिताचा निर्णय घेतला तर वर्तमान स्थितीत त्या निर्णयातुन आदर्श प्रस्थापित होवुन चांगला संदेश समाजात जातो ही खर्या अर्थाने भुषणावह गोष्ट असते. उदा.राज्य सरकारने गरजु महिलांच्यासाठी लाडकी बहिण योजना आणल्यानंतर विरोधकांनी सुरू केलेला बिनपैशाचा तमाशा ज्यातुन सामाजिक द्वेष नात्या-नात्यात निर्माण होवु शकतो. एकीकडे बहिण भावाच्या नात्यात खंडणा पडत असताना एव्हाना रक्ताची नातीही महत्वाची वाटत नसताना अशा योजनेद्वारे किमान आपल्या रक्तांच्या बहिणीविषयी असलेल्या नात्याची प्रबलता वाढु शकते. मात्र राजकारणात विरोधक सत्ताधार्याच्या निर्णयाकडे राजकिय स्वार्थाने जेव्हा पहातात तेव्हा समाजहित त्यांना महत्वाचं वाटत नाही हे दुर्दैव. लाडक्या बहिण योजनेचं जोरदार स्वागत राज्यात घराघरात होत असुन घोषणेप्रमाणे त्याचे पैसे देखील बहिणीच्या नावावर पडायला सुरूवात झाली. भावाने ओवाळणी पाठवली हा भावार्थ खर्या अर्थाने रक्ताच्या नात्यातील भाव जागृत करणारा दिसुन येतो. मात्र मविआच्या उल्लेख केलेल्या नेत्यांनी त्यांच्या बगलबच्यांनी योजनेलाच जाहिर विरोध केला. अगोदर ही योजना नको म्हणत सभागृहात विरोध केला, मुंबईच्या हायकोर्टात याचिका दाखल केली. न्यायदेवतेनं ही योजना जनहिताची सांगणं म्हणजे विरोधकांच्या थोबाडीत मारल्यासारखं होय. पण हे महाशय एवढ्यावर थांबले नाहीत. रस्त्यावर उतरून जाहिर सभा, मेळावे आणि माध्यमांच्या समोर घसे कोरडं करून योजना फसवी आहे सांगायला मागे राहिले नाहीत. अनेकांनी तर योजनेच्या आड पडून महिलांचे अपमान केले. दिड हजार रूपये देवु नका महिला भिकारी नाहीत असेही आक्षेप घेतले. खरं तर हा माता भगिनींचा अपमान असुन सुषमा अंधारेसारख्या महिला असताना देखील योजनेला विरोध करतात याचं नवलं. रोहित पवारसारखा तरूण योजना राबवु नका म्हणजे किती नतद्रष्ट ही मंडळी? कलाकार तर सामाजिक संवेदनशील असतात. पण खा.अमोल कोल्हेंना देखील योजनेचं पान्हा फुटला नाही. त्यांनी देखील करंटेपणाने योजनेला विरोध केला. विजय वडेट्टीवार, जितेंद्र आवाड आणि हो संजय राऊत यांनी तर बिनपैशाचा तमाशाच योजनेवरून चालु केला. एक गोष्ट खरी आहे की ज्यांना आपल्या बहिणीच्या नात्याची ओढ अशांनाच लाडक्या बहिणीचं महत्व कळेल. मविआच्या सार्या नेत्यांनी रक्षाबंधनाच्या शुभ मुहुर्तावर जाहिरपणे योजनेला विरोध केला. अगोदर उल्लेख केलेल्या नेत्यांच्या सख्या बहिणीला माझी विनंती आहे की तुम्ही आपल्या भावाला राखी बांधु नका. कारण हेच भाऊ तुमच्या लाडक्या योजनेच्या मुळावर उठले या शब्दांत प्रवक्ता राम कुलकर्णी यांनी विरोधकांचा समाचार घेतला.