मुंबई, दि. 6 : सिल्लोड तालुक्यातील अजिंठा गावाच्या परिसरातील पाणी टंचाई परिस्थिती दूर करण्यासाठी व या भागातील शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष दुरूस्ती व विस्तार योजनेअंतर्गत पुलवजा बंधारा प्रकल्पच्या पुनर्रचनेसंदर्भातील कार्यवाही तातडीने करावी. तापी खोरे विकास महामंडळामार्फत या प्रकल्पाचा समावेश एकात्मिक राज्य जल आराखड्यात करण्यासाठीच्या कार्यवाहीस गती देण्याचे निर्देश अल्पसंख्याक मंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळा अंतर्गतची कामे तसेच सिल्लोड- सोयगाव भागातील विकास कामांचा आढावा मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज मंत्रालयात घेतला. यावेळी ते बोलत होते. यावेळी महामंडळाचे कार्याकरी संचालक संतोष तिमनवार, मुख्य अभियंता विजय घोगरे, उपसचिव प्रविण कोल्हे, आदिसह अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. सत्तार म्हणाले की, या भागातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्यासाठी साखळी बंधारा प्रकल्पाची पुनर्रचना गतीने होणे गरजेचे आहे. तसेच सोयगाव तालुक्यातील सोयगाव लघु पाटबंधारे प्रकल्पातून कालव्यामधून बंद नलिकेद्वारे जंगला तांडा लघु पाटबंधारे प्रकल्पात अतिरिक्त पाणी सोडण्याच्या कामासाठीची निविदा काढण्यात यावी. खेळणा मध्यम प्रकल्पाची गोडबोले दरवाजे बसवून उंची वाढवणे, पूर्णा नदीवरील साखळी बंधारे प्रकल्पास स्वनिधी अंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात कार्यवाही करावी. चारूतांडा प्रकल्पांतर्गत पूल बांधकाम करण्यासंदर्भातील निविदा तातडीने काढण्याच्या सूचनाही यावेळी मंत्री श्री. सत्तार यांनी दिल्या.