नागपुरमधील उड्डाणपुल भूमिपुजनाचा कार्यक्रम भाजपाचा का सरकारचा? जाहिरात देण्याचा भाजपाला काय अधिकार ?: अतुल लोंढे
नागपुरातील कार्यक्रमातून भाजपाची हुकूमशाहीवृत्ती पुन्हा स्पष्ट, भाजपाला संविधानापेक्षा, पक्ष, संघ व मनुस्मृतीच श्रेष्ठ.
मुंबई, दि. ३ ऑगस्ट: भारतीय जनता पक्ष लोकशाही, संविधान मानत नाही हे वारंवार उघड झाले आहे, त्याविरोधी काँग्रेस एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून नेहमीच आवाज उठवत आला आहे. भाजपाच्या या तानाशाहीवृत्तीचा आज नागपुरातही प्रत्यय आला. नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भारतीय जनता पक्षाच्या नेते व मंत्र्यांच्या उपस्थितीत भूमीपूजनाचा कार्यक्रम झाला परंतु या कार्यक्रमाचे काँग्रेसच्या आमदारांना आमंत्रण दिले नाही. हा कार्यक्रम भाजपा पक्षाचा होता का सरकारचा, असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी विचारला आहे.
यासंदर्भात प्रतिक्रीया देताना अतुल लोंढे म्हणाले की, नागपुरातील म्हाळगीनगर व मानेवाडा वळण रस्त्याच्या उड्डाण पुलाचा भूमिपूजन कार्यक्रम आज होता. संविधानानुसार पक्ष व सरकार दोन्ही वेगळे आहेत परंतु भारतीय जनता पक्षाने या भूमीपूजन कार्यक्रमाच्या जाहिरातीत फक्त भाजपाचाच उल्लेख केला असून भाजपाचे मंत्री व आमदारांचेच फोटो दाखवले आहेत. कोणतेही सरकारी प्रकल्प हा जनतेच्या कराच्या पैशातून केला जातो, कोणत्याही पक्षाच्या पैशातून नाही, भाजपाचे नेते सरकारमध्ये असू शकतात पण या प्रकल्पाचा खर्च भाजपाने केला आहे का सरकारने? वास्तविक पाहता सरकारी कार्यक्रमात त्या भागातील सर्व पक्षाच्या लोकप्रतिनिधींना आमंत्रण दिले जाते व त्यांचे फोटोसह नावही असते पण भाजपाने कोणताही नियम पाळला नाही.
भाजपाला जर लोकसभा निवडणुकीत ४०० जागा मिळाल्या असत्या तर भाजपा म्हणजेच सरकार व संविधान आणि भाजपा म्हणजेच मनुस्मृती असेच ते वागले असते. भाजपा हे संविधान व लोकशाही मानत नाही हेच नागपुरातील कार्यक्रमातून दिसून आले आहे. भाजपासाठी पक्ष, संघ व मनुस्मृती हेच श्रेष्ठ आहेत हे पुन्हा स्पष्ट झाले आहे, असेही अतुल लोंढे म्हणाले.