सिल्लोड येथे ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेचा शुभारंभ महिला सक्षमीकरणामुळेच देश महासत्ता होईल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिला सशक्तीकरण मेळाव्यात उपस्थित बहिणींना आश्वस्त केले.
छत्रपती संभाजीनगर: महिलांच्या सक्षमीकरणामुळेच देश महासत्ता होईल. ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना ही महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणारी कायमस्वरुपी योजना असून सरकारकडून बहिणींना माहेरचा आहेर आहे. राज्यातील महिलांना आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिकदृष्ट्या सक्षम बनविणे हे सरकारचे ध्येय्य आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिला सशक्तीकरण मेळाव्यात उपस्थित बहिणींना आश्वस्त केले.
सिल्लोड येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचे आयोजन करण्यात आले. मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला सशक्तीकरणाच्या विविध योजनांचे लाभ आज महिलांना प्रदान करण्यात आले. ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेचा शुभारंभही यावेळी करण्यात आला. दोन लाख महिलांना लाभ मंजूर झाल्याची घोषणाही करण्यात आली.
या सोहळ्यास विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, पणन व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार, आ. प्रदीप जैस्वाल, आ. रमेश बोरनारे, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, महानगर पालिका आयुक्त जी.श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी भाषणाच्या सुरुवातीला ऑलम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडलवर नाव कोरणाऱ्या स्वप्नील कुसाळे या महाराष्ट्राच्या सुपुत्राचे अभिनंदन केले. तसेच ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्हा प्रशासनाचे आणि जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचंही अभिनंदन केले
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. तसेच जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या महिलांच्या सक्षमीकरणाच्या विविध योजनांच्या माहितीपुस्तिकेचे विमोचन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.