गुटखा विक्री विरोधात काँग्रेस आक्रमक
प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा काँग्रेस कमिटी देणार निवेदन
मुंबई: महाराष्ट्रामध्ये गुटखा विक्रीवर बंदी आहे. मात्र असे असतानाही सर्वत्र राजरोसपणे कुठल्याही भितीशिवाय पथ विक्रेते गुटखा विक्री करीत आहेत. प्रामुख्याने रुग्णालय, शाळा, रेल्वे स्थानक, बस स्थानक, बाजारपेठ अशा वर्दळीच्या ठिकाणी सर्रासपणे गुटखा विक्री होत आहे.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने या विरोधात आक्रमक भूमिका घेतली असून प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसच्या जिल्हा कमिटी प्रमुखांना प्रशासनास निवेदने देऊन कारवाई करण्याची मागणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
गुटख्यामुळे सर्वसामान्य जनतेला कॅन्सर, पाचन समस्या इत्यादी दुर्धर आजारांना सामोरे जावे लागते. गुटख्यामुळे कित्येक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. परिणामी त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकटे ओढावली आहेत.राज्य सरकारच्या मदतीमुळेच आपल्या राज्यात गुजरात येथून बेकायदेशिरपणे मोठ्या प्रमाणात गुटखा येत असून, राजरोसपणे गुटखा विक्री राज्यात सुरू आहे.याबाबत नुकताच झालेल्या अधिवेशनात काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी मुद्दा उपस्थित केला होता तर काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व मुंबईचे माजी उपमहापौर राजेश शर्मा यांनीही पत्रव्यवहार केला होता मात्र राज्यात अजूनही गुटखा विक्री होत असल्याने प्रदेश काँग्रेसने सर्व जिल्हा अध्यक्ष यांनी पोलीस प्रशासन,अन्न व औषध प्रशासन,जिल्हा आरोग्य प्रशासन यांच्यकडे निवेदन देऊन गुटखा विक्री व खरेदी करणाऱ्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.