भारतमहाराष्ट्रमुंबई

न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाचा अहवाल काय म्हणतो हे स्पष्ट करा

समित कदमाची नार्को चाचणी करा - महेश तपासे

मुंबई 29 जुलै: महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री श्री अनिल देशमुख यांनी विद्यमान गृहमंत्री व उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत खळबळाजनक खुलासा केला आहे. “आम्ही तुम्हाला सर्व आरोपातून दोष मुक्त करू पण तुम्हाला श्री उद्धव ठाकरे, श्री अनिल परब, श्री अजित पवार व आदित्य ठाकरे यांच्या विरोधात खोटे प्रतिज्ञापत्र बनवून द्यावे लागतील अशा प्रकारची सूचना देवेंद्र फडणवीस यांनी समित कदम यांच्यामार्फत अनिल देशमुख यांना केली असा गौप्यस्फोट नुकताच अनिल देशमुख यांनी केला.

अनिल देशमुख यांच्या गौप्य स्फोटाची गंभीर दखल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने घेतल्याची माहिती पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी माध्यमांना दिली.

राजकारण आणि सत्तेसाठी भारतीय जनता पार्टी किती खालची पातळी गाठू शकते याचे हे उदाहरण आहे असे तपासे म्हणाले. शिवसेना फोडण्याचं श्रेय याआधीच देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे घेतले आहे व त्यानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवारांना स्वतःच्या सरकारमध्ये सामील करत भाजपने महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची शिवसेना व शरद पवारांची राष्ट्रवादी ही नामशेष करण्याचा डाव आखला, परंतु मायबाप जनतेने लोकसभेच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस व भारतीय जनता पार्टी यांना त्यांची जागा दाखवली असा टोला महेश तपासे यांनी लगावला.

माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या खोट्या आरोपाचा आधार घेत भारतीय जनता पार्टीने अनिल देशमुख यांना टार्गेट केले होते. तत्कालीन ठाकरे सरकारने या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी चांदीवाल आयोगाची स्थापना केली होती.

न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाने त्यांचा अहवाल यापूर्वीच सरकारला सादर केला तरीही सरकार सदरचा अहवाल विधानसभेच्या पटलावर आणत नाही ही गंभीर बाब आहे व यातून शुद्ध राजकीय हेतू समोर येतो असा आरोप महेश तपासे यांनी केला.

न्यायमूर्ती चांदीवर आयोगाचा अहवाल सरकार का जाहीर करीत नाही याचे उत्तर मुख्यमंत्री शिंदे यांनी द्यावे अशी मागणी महेश तपासे यांनी उपस्थित केली.

समित कदम कोण आहे ? त्याचे आणि देवेंद्र फडणवीस यांचा संबंध काय ? कुठल्या कारणास्तव समित कदम याला वाय दर्जाची सुरक्षा देवेंद्र फडणवीस यांनी दिली याचा खुलासा राज्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करावा अशी मागणी महेश तपासे यांनी केली.

समित कदम या इसमाची नारको चाचणी करण्याची मागणी महेश तपासे यांनी यावेळी केली. हे संपूर्ण प्रकरण अतिशय गंभीर असून उपमुख्यमंत्री व गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे करणारे आहे यावर स्पष्टता येणे गरजेचे असल्याचेही तपासे यांनी म्हटले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button