नागपूरपुणेबातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

गणेशोत्सव जगातील महाउत्सव बनेल – पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा

विविध देशांच्या महावाणिज्य दूतांनी घेतले मुंबईतील मानाच्या गणपतींचे दर्शन

मुंबई, दि. 7
———————————-
विविध देशांतील महावाणिज्य दूतांना मुंबईतील मानाच्या गणरायांचे दर्शन घडविण्यात येत आहे. त्यांच्या माध्यमातून परदेशात प्रचार-प्रसार होऊन लाखो भाविक पर्यटक गणेशोत्सवासाठी महाराष्ट्रात येतील आणि नजिकच्या काळात हा उत्सव जगातील महाउत्सव बनेल, असा विश्वास पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाची जगभरात ओळख व्हावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणून पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्यावतीने विविध देशांच्या मुंबई स्थित महावाणिज्य दूतांना मानाच्या पाच गणपतींचे दर्शन घडविण्यात येत आहे. आज दुसऱ्या टप्प्यात मंत्री श्री.लोढा यांनी वडाळा येथील जीएसबी गणेश मंडळाजवळ १५ देशांतील महावाणिज्य दूतांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करून त्यांना गणेशोत्सवाच्या वैभवशाली परंपरेची ओळख करून दिली. यावेळी एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज, महाव्यवस्थापक चंद्रशेखर जैस्वाल आदी उपस्थित होते.

पर्यटन मंत्री श्री. लोढा म्हणाले, महाराष्ट्रात विविध प्रकारच्या पर्यटनाचा खजिना आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यटन विभागामार्फत देशातील पर्यटकांबरोबरच विदेशी पर्यटक राज्यात यावेत यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. ‘उत्सव पर्यटन’ हा त्याचा एक भाग असून भविष्यात सर्व प्रकारच्या पर्यटनाला चालना मिळावी यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.

पहिल्या टप्प्यात विविध दहा देशांतील महावाणिज्य दूतांना शुक्रवारी गणरायांचे दर्शन घडविण्यात आले होते. आज दुसऱ्या टप्प्यात 15 देशांतील महावाणिज्य दूतांनी वडाळा येथील जीएसबी गणेश मंडळ, लालबाग येथील गणेश गल्ली आणि लालबागचा राजा, गिरगाव येथील मोहन बिल्डिंग तसेच लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सर्वात जुन्या केशवजी नाईक चाळ येथील गणेशांचे दर्शन घेतले. सर्व गणेश मंडळांच्या वतीने त्यांचे पारंपरिक पद्धतीने उत्स्फूर्त स्वागत करण्यात येऊन त्यांना उत्सवाबाबत माहिती देण्यात आली.

गणरायांचे दर्शन घेऊन आणि भक्तीभावाने भारावलेले वातावरण पाहून अतिशय प्रसन्न वाटल्याची भावना महावाणिज्य दूतांनी यावेळी व्यक्त केली. भाविकांची प्रचंड संख्या, त्यांना सुरळीत दर्शन व्हावे यासाठी मंडळांमार्फत होत असलेले नियोजन याचे त्यांनी कौतुक केले.
प्रारंभी श्रीमती जयश्री भोज आणि श्री. जैस्वाल यांनी गुरूनानक खालसा महाविद्यालय येथे आयोजित समारंभात महावाणिज्य दुतांना फेटे बांधून पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. मागील दोन वर्षात गणेशोत्सवावर मर्यादा आल्या होत्या. यावर्षी राज्यात हा सण पुन्हा उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यामुळे या सांस्कृतिक, सामाजिक आणि धार्मिक परंपरेची जगभर ओळख करून देण्याचा उपक्रम राबविला जात आहे. आज या उपक्रमात सहभागी झालेल्या महावाणिज्य दूतांमध्ये जपानचे याशुकाता फुकाहोरी, स्वीडनच्या ॲना लेकवाल, आयर्लंडच्या अनिता केल्ली, इंडोनेशियाचे अगुस सापतोनो, दक्षिण आफ्रिकेच्या अँड्रिया कुन, फ्रान्सचे जीन मार्क सेरे चार्लेट, नेदरलँडचे बार्ट दे जोंग, थायलंडचे दोन्नावित पूलसावत, जर्मनीचे अचिम फॅबिग, अफगाणिस्तानच्या झाईका वार्डक, न्युझिलंडच्या नोरोना हेस, ब्रिटनचे संपर्क प्रमुख मॅथ्यू सिंकलेअर, श्रीलंकाच्या व्हिजा ऑफीसर सुमिथ्रा मिगासमुल्ला, बेल्जियमच्या वाणिज्यदूत आणि उपप्रमुख ज्युली वॅन देर लिंडेन, नॉर्वेच्या महावाणिज्य दूतांची पत्नी हेज रॉनिंग, इटलीचे उप महावाणिज्य दूत लुईगी कॅसकोन यांच्यासह त्यांचे सहकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button