महाराष्ट्रमुंबई

पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्या वडेट्टीवार यांच्याशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का ? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल

हेमंत करकरे यांची हत्या अजमल कसाब ने केली नाही असे म्हणणारे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे पाकिस्तानचीच भाषा बोलत असूनही काँग्रेसशी आघाडी केलेले उद्धव ठाकरे या विषयावर अद्यापि गप्प आहेत

मुंबई: हेमंत करकरे यांची हत्या अजमल कसाब ने केली नाही असे म्हणणारे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे पाकिस्तानचीच भाषा बोलत असूनही काँग्रेसशी आघाडी केलेले उद्धव ठाकरे या विषयावर अद्यापि गप्प आहेत. उद्धव ठाकरे यांनी आपण वडेट्टीवार यांच्या आरोपाशी सहमत आहोत का, हे जाहीर करावे असे आव्हान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिले. मुंबई हल्ल्यातील आरोपींना शिक्षा बजावण्यात ॲड.उज्ज्वल निकम यांनी बजावलेल्या भूमिकेचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कौतुक केले होते. मात्र वडेट्टीवार हे निकम यांच्यावर बेछूट आरोप करत असताना मतांच्या लाचारीमुळे उद्धव ठाकरे गप्प बसले आहेत, असेही श्री.फडणवीस यांनी सांगितले.
मुंबई भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा सरचिटणीस संजय उपाध्याय, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रदेश सहमुख्य प्रवक्ते आशीष देशमुख, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचा नेता पाकिस्तानधार्जिणी वक्तव्ये खुलेआम करत असताना उद्धव ठाकरे मात्र मूग गिळून गप्प आहेत. हेमंत करकरे हे अजमल कसाब च्या गोळीनेच हुतात्मा झाले हे न्यायालयातही सिद्ध झाले असताना वडेट्टीवार पाकची भाषा बोलत आहेत असा घणाघात श्री.फडणवीस यांनी केला. पाकिस्तानमधील कुणाच्या संपर्कात वडेट्टीवार आहेत असा सवालही त्यांनी केला.
मुंबई हल्ल्याबाबत न्यायालयात सर्व बाबी स्पष्ट झाल्या आहेत. 26 नोव्हेंबरचा दहशतवादी हल्ला हा पाकिस्तानचा कट होता आणि अजमल कसाबच्या गोळीनेच हेमंत करकरे हुतात्मा झाले हे न्यायालयामध्ये सिद्ध होऊन पाकिस्तान तोंडघशी पडले होते याचीही आठवण श्री. फडणवीस यांनी करून दिली. शेकडो मुंबईकरांचा जीव घेणा-या अजमल कसाब सोबत काँग्रेस असून भाजपा ॲड. उज्ज्वल निकम यांच्या पाठीशी आहे असेही श्री. फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button