मुंबई पोलिसांनी कच्छमधील माता नो मठ या मंदिरातून दोन्ही आरोपींना अटक,
बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. गुजरात राज्यातील कच्छ जिल्ह्यातील लखपत तालुक्यात असलेल्या माता नो मठ या मंदिरात झोपलेले असताना आरोपी सागर पाल (वय २५) आणि विकी गुप्ता (वय २५) या दोघांना मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. या दोन्ही आरोपींना मुंबईतच पिस्तूल पुरवण्यात आले होते असून ते त्यांनी वाटेत नदीत फेकून दिले अशी माहिती मिळत आहे. मात्र, गुन्हे शाखेच्या कक्ष ९ च्या पोलिसांनी आणि खंडणी विरोधी पथकाच्या पोलिसांनी दोन्ही आरोपींना शिताफीने अटक केली असून किल्ला कोर्टात हजर केले असता कोर्टाने दोन्ही आरोपींना २५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त लखमी गौतम यांनी दिली आहे.
बाईट : लखमी गौतम, सहपोलीस आयुक्त, गुन्हे शाखा
गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त लखमी गौतम यांनी पुढे सांगितले की, दोन्ही आरोपी बिहारमधील चंपारण्य येथील रहिवाशी असून २८ फेब्रुवारीला मुंबईत आले होते. सलमान खानचा अंगरक्षक याच्या तक्रारीवरून वांद्रे पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भारतीय दंड संविधान कलम ३०७, ३४, १२० ब आणि शस्त्र अधिनियम कलम ३ आणि २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याची जबाबदारी फेसबुक खातेधारक अनमोल बिष्णोई नावाच्या इसमाने फेसबुक पोस्टद्वारे घेतली होती. त्यामुळे त्याबाबत देखील तपास सुरु आहे.
या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन हा गुन्हा गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलाय. या गुन्ह्याच्या तपासासाठी गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची ऐकून १२ पथके तयार करण्यात आली होती. मानवी तपास कौशल्य आणि तांत्रिक बाबींचा वापर करून आरोपींना अटक करण्यात आली आहे. सागर पाल याने सलमानच्या घरी गोळीबार केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. सागर पाल यापूर्वी कामानिमित्त हरियाणात गेला होता आणि तिथल्या बिष्णोई टोळीच्या संपर्कात आला होता. नंतर विकी गुप्ताही कामानिमित्त हरियाणाला गेला आणि तिथे सागर पाल विक्कीला भेटला. सागर पाल यांनीच विक्कीची बिश्नोई टोळीशी संबंधित लोकांशी ओळख करून दिली. आता या प्रकरणात कलम 120ब देखील जोडण्यात आले आहे.
आरोपी सागर पाल त्याने हरियाणा मध्ये दोन वर्ष काम केले आहे. नवी मुंबईमध्ये सलमान खानच्या फार्म हाऊस पासून दहा किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या फ्लॅटवर हे दोन्ही आरोपी राहत होते. या दोघांनीही आधार कार्ड देऊन दहा हजार डिपॉझिट देऊन साडेतीन हजार रुपयांच्या भाडेतत्त्वावर एग्रीमेंट बनवून वन बीएचके फ्लॅट 11 महिन्यांच्या मुदतीवर घेतला होता.तसेच 2 एप्रिल ला 24 हजार रुपयांना सेकंड हॅन्ड बाईक आरोपी सागर पाल याने विकत घेतली होती.