सुप्रियाताई सुळेंनी मानले सुप्रीम कोर्टाचे आभार
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांचा फोटो आणि त्यांचे नाव बॅनर्सवर लावू नका आणि असे पुन्हा होणार नाही, असे लेखी लिहून देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवार गटाला देण्यात आले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांचा फोटो आणि त्यांचे नाव बॅनर्सवर लावू नका आणि असे पुन्हा होणार नाही, असे लेखी लिहून देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवार गटाला देण्यात आले आहेत. कोर्टाच्या या निर्णयाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रियाताई सुळे यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना सुप्रीम कोर्टाचे आभार मानले आहेत.
सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, जे शरद पवार यांचा फोटो वापरतात, ते स्वतः एका वेगळ्या विचारामध्ये काम करू इच्छितात, जर ते एका वेगळ्या विचारासाठी काम करत असतील आणि त्यासाठी ते शरद पवारांना सोडून गेले असतील तर त्यांनी पवारांचा फोटो वापरायचा की नाही, याबाबतचा निर्णय आता आलेला आहे. तर आणखी एका गोष्टीसाठी सुप्रिम कोर्टाचे आभार मानते. कारण, त्यांनी वक्तव्य करत म्हटले की, निवडणूक आले की तुम्हाला शरद पवार आठवतात आणि निवडणुका संपल्या की तुम्ही त्यांना सोडता. असे मी नाही सुप्रीम कोर्टाने आपल्या ऑर्डरमध्ये म्हटले आहे. पण आता मंगळवारी या प्रकरणावर सुनावणी पार पडणार आहे, ज्यानंतर या प्रकरणी बोलणे योग्य ठरले, असेही सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.
पुढे सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, निवडणुकीच्या १५ दिवस आधी गॅसच्या दरात कपात केली जाते हे मला खूप गमतीशीर वाटतं. मी संसदेत प्रत्येक भाषण मन लावून आणि कान देऊन ऐकत असते. जेव्हा दरवाढ होते तेव्हा कंपन्यांनी दर वाढवले, सरकारने दर वाढवले नाहीत असं सांगितलं जातं, मग जेव्हा दर कपात केली जाते तेव्हा त्याचं क्रेडिट सरकार घेतं आणि इंधनाचे दर वाढवतं तेव्हा कंपनीवर खापर फोडतात हा कुठला न्याय आहे? असा सवाल सुप्रियाताई सुळे यांनी उपस्थित केला आहे. तसेच इंधनाचे दर वाढले तरी कंपनी आणि दर कमी झाले तरी कंपनीलाच क्रेडिट गेलं पाहिजे. तुमच्या सोयीनेच सगळं काही होत नाही. आता तर लोकसभेच्या निवडणूका आल्या आहेत, काहीही होऊ शकतं, गाजराचा पाऊसही पडणार असेही सुप्रियाताई सुळे यांनी म्हटले आहे.
सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, अजित पवारांनी मोक्कापासून वाचवणं ही बाब धक्कादायक आहे. त्यांनी नेमकं कोणाला वाचवलं?, कोणत्या केसमधून वाचवलं?,आणि एवढ्या मोठ्या मोक्कामधून वाचवण्याची कारणं कोणती होती? याची माहिती द्यायला हवी आणि सोबतच सरकारनेदेखील याचं उत्तर द्यायला हवं. असेही सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.
सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, इलेक्ट्रोरल बॉण्ड कोणी दिले, ते कोणत्या पक्षाला दिले शिवाय कोणाला मिळाले, यासंदर्भात सगळी माहिती मिळायला हवी. त्यासोबतच इलेक्ट्रोरल बॉण्डची श्वेतपत्रिका काढायला हवी, असे सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.
यावर सविस्तर बोलताना सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, सध्या मोदी सरकारकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. याआधी कधीच सरकारकडून केंद्रीय यंत्रणा ईडी, सीबीआय, इनकम टॅक्ससारख्या स्वायत्त संस्थांमध्ये सरकारने हस्तक्षेप केलेला नव्हता. आता मात्र, दुर्देवाने अदृश्य शक्ती या यंत्रणांचा वापर करुन महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यांत पक्षफोड, घर फोडीचं, दडपशाहीच राजकारण केलं जात आहे. सध्या लोकशाही संपत चालली असून दडपशाही सुरु आहे, हे भाजप सरकारचंच पाप आहे असे सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.
सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, मागील १५ वर्षांपासून मी राष्ट्रवादीच्या विचारांचीच खासदार आहे. मी संसदेत केलेल्या भाषणांबद्दल सत्ताधारी नेत्यांकडून ऑन रेकॉर्ड माझी प्रशंसा केली जाते. यामध्ये मंत्री आश्विनी वैष्णव, नितीन गडकरी, निर्मला सीतारामण यांनी अनेकदा प्रशंसा केलेल्या आहेत. ज्यांना माझ्यावर काही आरोप करायचे असतील करु द्या, विरोधक जरी असला तरी तो दिलदार असला पाहिजे, तभी तो मज्जा है त्यामुळे टीका करण्याचा हक तो बनता है ना, असे म्हणत सुप्रियाताई सुळे यांनी विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे.