धनंजय रुक्मिणी पंडीतराव मुंडे; महिला धोरणाची अंमलबजावणी
अन मुंडेंनी मंत्रालयातील नावाची पाटी बदलली
राज्यात नव्याने घोषित करण्यात आलेल्या चौथ्या महिला धोरणातील नियमांची कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी अंमलबजावणी केली असून त्यांनी आपल्या नावामध्ये वडिलांच्या नावाआधी आईचे नाव असलेली पाटी आपल्या मंत्रालयातील दालनामध्ये लावली आहे. त्यामुळे आता मंत्री श्री.मुंडे यांचे नाव ‘धनंजय रुक्मिणी पंडीतराव मुंडे’ अशी नावाची पाटी मंत्रालयात लावण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा तसेच महिला व बालविकास मंत्री कु.अदिती तटकरे यांच्या माध्यमातून राज्याचे चौथे महिला धोरण नुकतेच घोषित करण्यात आले. या महिला धोरणामध्ये स्त्री-पुरुष समानतेला विशेष महत्त्व देण्यात आले असून आईचे आयुष्यातील स्थान देखील अधोरेखित करण्यात आले आहे.
नव्या धोरणानुसार शासकीय कामकाजामध्ये आपले संपूर्ण नाव लिहिताना वडिलांच्या नावा अगोदर आईचे नाव लिहिण्याची प्रथा नव्याने सुरू करण्यात आली असून याची अंमलबजावणी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे.