सगळं दिलं पण पाच टक्केही निष्ठा पाळली नाही शरद पवार साहेबांचा हल्लाबोल
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब
पुणे
दत्तात्रय वळसे पाटील यांनी माझ्याबरोबर अतिशय प्रामाणिकपणे काम केलं. आंबेगाव तालुक्याने दत्तात्रय वळसे पाटील सारखे नेते दिले. त्यांच्या वारसदारांना आम्ही खूप काही दिलं. विधानसभेचं अध्यक्ष केलं, मंत्रिपदं दिलं, देशाच्या साखर उद्योगाचे अध्यक्षपद दिलं, अनेक संस्थांवर काम करण्याची संधी दिली. एवढं दिल्यानंतरही दत्तात्रय पाटील यांच्या ठायी जी निष्ठा होती त्यातील पाच टक्के निष्ठा सुद्धा दिलीप वळसे पाटील यांच्यात नाही असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांनी आंबेगाव विधानसभेतील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हटले आहे.
शरद पवार साहेब म्हणाले की, जर हे लोक आम्हा लोकांबरोबर निष्ठा ठेवत नसतील तर उद्या निवडून दिल्यानंतर जनतेशीही निष्ठा ठेवणार नाहीत, एवढंच मला सांगायचे आहे. हे चित्र बदलायचे असेल तर तुम्हा सर्वांना जागं राहावं लागेल. पुढील दोन महिने आम्ही पिंजून काढू. निष्ठवंतांना निवडून आणू, तुम्हीही निष्ठवंतांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा, हीच अपेक्षा मी व्यक्त करतो, असेही आवाहन शरद पवार साहेब यांनी केले.
पुढे शरद पवार साहेब म्हणाले की, डॉ. अमोल कोल्हे यांच्यासारखा खासदार इथल्या जनतेने निवडून दिला. लोकसभेत ते बोलायला लागल्यानंतर इतर खासदार अतिशय शांतपणे त्यांचे म्हणणे ऐकून घेतात. कोल्हेंसारख्या निष्ठावान लोकांची आज गरज आहे. सामान्य माणसाला जागं करून जनतेच्या कामांना प्राधान्य देणाऱ्या नेत्यांची निवड करा असे शरद पवार साहेब यांनी म्हटले आहे.
शरद पवार साहेब म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष मी उभा केला. यांना निवडून आणलं. हे उमेदवार माझ्या नावाचा फोटो घेऊन निवडणून आले आणि आता सोडून गेले. पूर्वी माझ्यासोबत काम करणारे आज नाहीत पण त्यांच्यात निष्ठा होती. काय कमी केलं विधानसभा, मंत्री अनेक पद दिली, ऐवढं सर्व दिलं, तरी पाच टक्के तरी निष्ठा ठेवायला हवी होती. यापुढे नागरिक तुमच्या बाबत निष्ठा ठेवणार नाहीत असेही पवार साहेब म्हणाले.
शरद पवार साहेब म्हणाले की, आज देशात वेगळं चित्र आहे. शेतीशी इमान राखणारे तुम्ही आहात. मात्र आज देशात कुठे गेलं तरी काळ्या आईशी इमान राखणारे संकटात असलेले दिसतात. घाम गाळून कष्ट करून मेबादला मिळत नाही. खर्च जास्त आणि उत्पन्न कमी अशी परिस्थिती आहे. शेतकरी कर्जबाजारी होत आहे सन्मानाने जगण्याची इच्छा शेतकऱ्याची आहे. १० वर्षापूर्वी शेतीची जबाबदारी माझ्याकडे होती. पहिल्या फाईलमध्ये देशात गहू तांदुळसाठा नव्हता. त्यावेळी झोप आली नाही. देशाची शेतीप्रधान ओळख असताना धान्य परदेशातून आणायचं ही परिस्थिती समोर होती. ती यशस्वीपणे सांभाळली आहे. असेही शरद पवार साहेब यांनी बोलताना म्हटले आहे.
शरद पवार साहेब म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना आस्था नाही. भाजपला ज्या ज्या विरोधी पक्षातील नेत्यांनी विरोध केला, त्यांच्या मागे ईडी लावण्यात आली. आता तुरुंगात टाकलं जात आहे. आजच्या राज्यकर्त्यांना मनासारखी भूमिका घेणाऱ्या लोकांची गरज आहे. विरोधात गेले की तुरुगांत टाकतात. अशोक चव्हाण यांना कॉंग्रेसने मुख्यमंत्री केलं ते विसरून ते भाजपात गेले. तुरुंगात जाण्यापेक्षा सोबत गेले. आजचा नारा तुरुंगापेक्षा भाजप बरा, अशी अवस्था राजकारणाची झाली आहे असे शरद पवार साहेब म्हणाले.
शरद पवार साहेब म्हणाले की, बऱ्याच दिवसांनी जाहीर सभेच्या निमित्ताने आज मी तुमच्या समोर आलो आहे. आज वेगळा काळ आहे, देशात वेगळं चित्र आहे. शेतीशी इमान राखणारे आज तुम्ही सगळे समोर आहात. देशात कुठं ही गेलो तरी पाहतो, काळ्या मातीशी इमाने इमानदार असणारा शेतकरी संकटात आहे. तो घाम गाळतो, पण पिकाला रास्त भाव मिळेना. असं घडलं की शेतकरी कर्जबाजारी होतो. अशावेळी सावकार आणि बँका घरातील वस्तूही नेतात. सन्मानाने जगणाऱ्या शेतकऱ्यांवर हे अस्मानी संकट आहे. असेही शरद पवार साहेब यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
शरद पवार साहेब म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक जाहिरात आहे. मोदींची गॅरंटी, कोणाची गॅरंटी तर मोदींची, काय गॅरंटी तर शेतीला भाव, तुमच्या मुलाला नोकरी, वगैरे वगैरे अशी गॅरंटी देतात. एकीकडे ही गॅरंटी अन दुसरीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. असेही शरद पवार साहेब म्हणाले.
*लय विषय उघडला तर सगळं टोकाला जाईल
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील*
लय विषय उघडला, तर सगळं टोकाला जाईल. मुळात आपला पक्ष म्हणजे शरद पवार साहेब आहेत. त्यामुळं तर दिल्ली सुद्धा या नावाला घाबरून असते. त्यांचे डाव आम्ही पाहिले आहेत. ते काय करतील हे कोणीच सांगू शकत नाही. मध्ये कोणीतरी तेल लावून पैलवान तयार होता, त्यांची काय अवस्था केली हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलं. वस्ताद एक डाव मागे ठेवतात, त्यामुळं पवार साहेबांनी शेवटचा एक डाव मागे ठेवला आहे, जो त्या सर्वांना चितपट करेल यात शंका नाही, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.
अहो पोटी जन्माला येण्यापेक्षा निष्ठेने वागणं खूप महत्त्वाचं – खासदार अमोल कोल्हे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी ज्यांनी बलिदान दिले. अनेक वार छाताडावर झेलले, त्यातील प्रत्येकजण छत्रपतींच्या पोटी जन्माला आले नव्हते. त्यामुळं अनेकांना वाटतं की पोटी जन्माला येणं गरजेचं आहे. अहो पोटी जन्माला येण्यापेक्षा निष्ठेने वागणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं पोटी जन्माला येण्यापेक्षा ज्याने बोटाला धरून चालवलं, त्याच्या सोबत चालणं गरजेचं असतं असे अमोल कोल्हे म्हणाले.
अमोल कोल्हे म्हणाले की, २०१९ मध्येही शिरूर लोकसभेत शरद पवार साहेबांना आव्हान देण्यात आलं. त्यावेळी मी इथून खासदार झालो. आताही शिरूर लोकसभेसाठी शरद पवार साहेबांना आव्हान देण्यात आलं. यावेळी सुद्धा आंबेगावची जनता पुन्हा तोच विश्वास दाखवणार यात शंका नाही, असेही ते म्हणाले. दिल्लीतून गुबूगुबू म्हटल्यावर माना डोलवणारे खासदार निवडून द्यायचे की तुमच्या हक्काच्या प्रश्नांसाठी लढा उभारणारे वाघ खासदार म्हणून निवडून द्यायचे हे तुम्ही ठरवा, असेही अमोल कोल्हे म्हणाले.