मुंबई,
महात्मा गांधी यांच्या स्मृतीदिनी मंत्रालयाशेजारील उद्यानातील महात्मा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महात्मा गांधी स्मारक समितीच्या वतीने पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
महात्मा गांधी स्मारक समितीचे उपाध्यक्ष सुमंत पोवार, सचिव प्रा. अमर सिंग,सहसचिव रवींद्र बंगेरा,सगुण धरणे, भरत खाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी नाईक यांनी महात्मा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार व पुष्प अर्पण करून अभिवादन केले. कुलाबा पब्लिक शाळेचे विद्यार्थी व नागरिक यावेळी उपस्थित होते.
झोरोस्ट्रियन प्रार्थना रुक्षभ पन्हाली, ख्रिश्चन प्रार्थना बिशप अनिल कुमार, बुद्धिस्ट प्रार्थना दीपक क्षीरसागर, मुस्लिम प्रार्थना मझरूल इस्लाम, जैन प्रार्थना भरत बोरा, शीख प्रार्थना अमरजित सिंग, हिंदू प्रार्थना भुपेंद्र याज्ञिक, राष्ट्रीय प्रार्थना प्रा.अमर सिंग यांनी सादर केली. कुलाबा पब्लिक शाळेच्या विद्यार्थ्यांची महात्मा गांधी यांच्यावर कार्यावर भाषणे झाली.
महात्मा गांधी स्मारक समितीचे उपाध्यक्ष श्री.पोवार म्हणाले की, महात्मा गांधी यांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान मोलाचे आहे. त्यांनी देशवासियांना आपल्या कार्यातून प्रेरणा दिली. सत्य, अहिंसा बंधुता या त्रिसूत्रीचा त्यांनी आपल्या जीवनात अंगीकार करून स्वराज्यासाठी लढा दिला. विद्यार्थ्यांनी देशाचे चांगले नागरिक व्हावे. महात्मा गांधी यांचे कार्य, विचार आत्मसात करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.