महाराष्ट्रावर विश्वास असल्याने अनेक देश राज्यात गुंतवणुकीस उत्सुक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
दावोस येथे नुकत्याच झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रामध्ये परकीय गुंतवणूक करण्याचा कल मोठ्या प्रमाणात दिसून आला आहे. महाराष्ट्र राज्यावर विश्वास असल्याने अनेक देश राज्यात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे या वर्षी 3 लाख 53 हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त परकीय गुंतवणुकीच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली असून आणखी कोट्यावधी रुपयांचे करार होणे अपेक्षित असल्याची माहिती मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिली.
राज्याच्या प्रगतीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा मोठा हातभार आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात अनेक पायाभूत विकासाचे प्रकल्प येत आहेत. दावोस येथे अनेक देशांचे राजकीय नेते, प्रशासक, उद्योजक व गुंतवणूकदार यांच्या भेटी झाल्या त्यावेळी त्यांनी प्रधानमंत्री श्री.मोदी यांच्यावर विश्वास व्यक्त केला असून श्री. मोदी हे संपूर्ण जगात भारताचे महत्त्व वाढवत असल्याचा अनुभव मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितला.
सोलापूर हे देशातील सर्वात मोठे श्रमिकांचे शहर असल्याचे सांगून रे नगर येथील गृहप्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण होऊन पंधरा हजार नागरिकांना त्यांच्या हक्काचे पक्के घर मिळत असल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी आनंद व्यक्त करून त्या सर्व कुटुंबांना शुभेच्छा दिल्या.
प्रारंभी रे नगर फेडरेशन व गृह प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक नरसय्या आडम यांनी प्रास्ताविक केले. या गृह प्रकल्पाविषयी तसेच हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र शासन राज्य शासन व जिल्हा प्रशासनाने बजावलेल्या भूमिकेची माहिती त्यांनी दिली.
अमृत योजनेंतर्गत 1 हजार 201 कोटी रुपयांच्या कामाचा शुभारंभ
केंद्र शासनाच्या अमृत.2 योजनेअंतर्गत भिवंडी-निजामपूर, सांगली, उल्हासनगर व कल्याण डोंबिवली या महापालिका तर शेगाव, सातारा व भद्रावती या नगरपालिका यांच्या मंजूर असलेल्या एकूण 1 हजार 201 कोटी एक हजार रुपयांच्या खर्चाच्या पाणी पुरवठा व मलनिस्सारण व्यवस्थापन विकास कामांचे भूमिपूजन प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन करण्यात आले.
रे नगर गृह प्रकल्प येथील तीन लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात पंतप्रधान श्री.मोदी यांच्या हस्ते घराच्या चावीचे वितरण करण्यात आले. सोलापूर महानगरपालिका अंतर्गत पीएम स्वनिधी योजनेच्या तीन लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात दहा हजार रुपये कर्ज मंजुरीचे पत्रही यावेळी वितरित करण्यात आले.