मुंबईकरांच्या मनातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे मुंबईचे स्वप्न आता आपल्याला पुर्ण करायचे आहे
मुंबईकरांच्या मनातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे मुंबईचे स्वप्न आता आपल्याला पुर्ण करायचे आहे
श्रीश उपाध्याय/मुंबई
मुंबई, दि. २० ऑगस्ट
जे स्वप्न मुंबईकरांच्या मनातील मुंबईकरीता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरें यांनी बघितलं होतं ते स्वप्न पूर्ण करायचे ही जबाबदारी आपली आहे. कारण त्यांचं नाव सांगून जे निवडून आले त्यांनी त्यांचं स्वप्न धुळीस मिळवले. ते स्वप्न पूर्ण करू शकले नाहीत, ते इतके आत्ममग्न होते, इतके आत्मकेंद्रीत होते की, स्वतःच्या पलीकडे ते पाहू शकले नाहीत. या मुंबईकराकडे त्यांनी कधीही बघितले नाही. आता मुंबईकरांसाठी काम करणाऱ्यांना आपण निवडून आणायचे आहे आणि मुंबईकरांनी जे स्वप्न पाहिले आहे, जे स्वप्न वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी पाहिले आहे, ते पुर्ण करण्याचे काम आता आपल्याला करायचे आहे त्यासाठी कामाला लागा असे आवाहन, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात आज मुंबई भाजपाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यात नवनिर्वाचित मुंबई अध्यक्ष आमदार अँड. आशिष शेलार, कँबिनेट मंत्रीपदी वर्णी लागलेले मंगलप्रभात लोढा यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. खा. गोपाळ शेट्टी, खा. पूनम महाजन, खा. मनोज कोटक, आ. प्रवीण दरेकर, आ. अमित साटम, आ. पराग अळवणी, आ. तमिल सेल्वन, आ. योगेश सागर, मनिषा चौधरी, माजी मंत्री प्रकाश महेता, राज पुरोहित, भाई गिरकर, माजी खा. किरिट सोमय्या उपस्थित होते.आपल्याला बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे
मागच्यावेळीच भाजपचा महापौर झाला असता. पण शिवसेनेसाठी आम्ही दोन पावलं मागे आलो, असा गौप्यस्फोटही देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसेच जे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर निवडून आले त्यांनी मुंबईला वाऱ्यावर सोडलं. आपल्याला बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, असेही श्री. फडणवीस म्हणाले..आशिषजी यांना ट्वेंटी-ट्वेंटी खेळायचे माहित आहे
आशिष तुम्ही क्रिकेट खेळणारे आहात आणि जाणाणारे आहात. त्यामुळे तुम्हाला ट्वेंटी ट्वेंटी कशी खेळायची आणि जिंकायची तुम्हाला माहीत आहे. हा सामना तुम्ही जिंकणारच असेही श्री. फडणवीस म्हणाले..
रेकॉर्ड ब्रेक स्ट्राईक रेट यावर आमची नजर
एमसीएमध्ये शेलारांनी मुंबई प्रीमीयर लिग सुरू केली आहे. आता पालिकेत मुंबई महापालिका विकास लीग तयार करायची आहे. मध्ये एखादा फुटबॉल आला, अडथळा आला तर त्याला किक कशी मारायची हे तुम्हाला माहीत आहेत. तुम्ही दोरी उड्या असोसिएशनचे अध्यक्ष आहात. त्यामुळे कुणी कितीही उड्या मारल्या तरी त्याला किती उड्या मारू द्यायच्या हे तुम्हाला माहीत आहे. मागचा आपला स्ट्राईक रेट मोठा होता. आपण ३५ वरून ८२ जागांवर आलो. आता आपला स्ट्राईक रेट मागचा रेकॉर्ड मोडणारा असला पाहिजे याकडे आमची नजर आहे, असंही त्यांनी सांगितलं.झोपडट्टीवासीयांच्या अडचणी दूर करू
धारावीचे सर्व प्रश्न मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वात पूर्ण होतील. धारावीतील लोकांना त्यांच्या स्वप्नातील घर देवू.. झोपडट्टीवासीयांच्या अडचणी दूर करू . झोपडपट्टीवासियांना त्यांच्या हक्काचे घर मिळेल त्यासाठी आपले सरकार प्रयत्न करेल. पुनर्विकासातील प्रकल्पग्रस्तांना भाडे मिळाले पाहिजे यासाठी सरकार प्रयत्न करेल. पुनर्विकासाचे रखडलेले प्रकल्प पूर्ण करू.. जनतेपर्यंत आपले काम घेऊन जाऊ.
भ्रष्टाचाराचा विळखा सोडवू
आशिष जी हे मराठीची सेवा करणारे व्यक्तिमत्व आहे. मुंबई महापालिकेवर भ्रष्टाचाराचा मोठा विळखा पडला आहे. आपण भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे बाहेर काढली आहेत. मुंबईतील सामान्य लोकांचा पैसा काही लोकांच्या तिजोरीत कशाप्रकारे गेला हे आपण पाहिले आहे. हजारो कोटी अर्थसंकल्प असलेल्या मुंबईत दरवर्षी पाणी तुंबलेले आपण पाहतो. दरवर्षी तेच रस्ते आणि तेच खड्डे आपण पाहतो. अनेक शहरांमध्ये काँक्रीटचे रस्ते पूर्ण होऊन तिथे कधीच खड्डे पडत नाहीत. मुंबईत पावसाळा आला की कुलाब्यावरून बोरिवली पर्यंत जायला चार तास लागतात अशी वेस्टर्न हायवेची परिस्थिती आहे. एकेका प्रकल्पाचे काम मुंबई महापालिकेत पंधरा वर्षे चालू आहे. ते प्रकल्प नसून जुन्या लोकांची दुभती गाय आहे. अशाप्रकारे वर्षानुवर्ष हे मलई खात आहेत. कोरोनाच्या काळात प्रेताच्या टाळूवरचे लोणी यांनी खाल्ले.कंपनी तयार करून कोट्यावधी रुपये खावून टाकले. मुंबईच्या सौंदर्यीकरण झाले पाहिजे पण आपल्या लोकांना तीच ती कामे देणे म्हणजे मुंबईतील सामान्य लोकांना धोका देण्यासारखे आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या विळख्यातून महानगरपालिकेला बाहेर काढावे लागेल. काही लोकांना मुंबईचे राज्य गेल्याचे दुःख होते. कारण २५ वर्षे या भरोशावर त्यांनी पोट भरले आहे. आता मुंबई मुठभर लोकांच्या हातात राहणार नाही. ती परिवाराची, घराण्याची राहणार नाही. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जे स्वप्न पाहिले होते ते स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे. त्यांचं नाव सांगून जे निवडून आले त्यांनी त्यांचेच नाव धुळीस मिळवले आहे. ते इतके आत्मकेंद्रीत होते की स्वतःच्या पलीकडे ते पाहू शकले नाहीत. मुंबईकराना कधीही अशा प्रकारचे लोकं मुंबईच्या महापालिकेत निवडून आणायचे नव्हते.
मुंबईच्या बाबतीत बाळासाहेब ठाकरे यांनी जे स्वप्न पाहिले आहे ते येत्या काळात पूर्ण करायचे आहे. त्यासाठी आपल्या सगळ्यांना मेहनत घ्यावी लागेल.
डायलॉग तरी चेंज करा
निवडणूक जवळ आल्यावर भावनिक मुद्दे सुरू होतील. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचं षडयंत्र… असा आरोप होईल. त्यांना माहीत आहे, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडलं जाणार नाही. कारण संविधान आहे. पण मुद्दाम भ्रम तयार केला जात आहे. त्यांनी किमान डायलॉग तरी चेंज करावा, असा टोला त्यांनी लगावला.
मुंबई दिल्लीसमोर झुकणार नाही
मुंबई मुंबई आहे. मुंबई आर्थिक राजधानी आहे. दिल्ली दिल्ली आहे. देशाची राजधानी आहे. मुख्यमंत्री दिल्लीत गेले तर दिल्लीश्वरांसमोर झुकले. अरे एवढे दिवस काँग्रेसचे मुख्यमंत्री, मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. तेही दिल्लीत जायचे. जावंच लागतं दिल्लीत. ती राजकीय राजधानी आहे. दिल्ली राजकीय राजधानी असेल तर दिल्लीत जावंच लागेल. त्याशिवाय प्रकल्प कसे पूर्ण होतील? तुम्ही दिल्लीत गेला. पण सोनिया गांधींसमोर नतमस्तक होण्यासाठी गेला. काही झालं तरी चालेल पण मुंबई दिल्लीसमोर झुकणार नाही. पण मुंबईकरांच्या हितासाठी मुख्यमंत्री आणि मला जितकी वेळा जावं लागेल तितके वेळा जाऊ आणि मान्यता आणू असेही श्री. फडणवीस म्हणाले.