राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवसीय शिबिराचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहणाने सुरुवात
यंदाच्या निवडणुकीचं वर्ष हे संघर्षाचं वर्ष -प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील
शिर्डी-
दि.३ जानेवारी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, आदरणीय खासदार शरद पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत शिर्डी येथे ज्योत निष्ठेची- लोकशाहीच्या संरक्षणाची अंतर्गत महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन दिवसीय शिबिराला आज पासून शुभारंभ झाला. यावेळी शरद पवार साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून, ज्योत प्रज्वलित करून कार्यक्रमाचा शुभारंभ केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष तथा आमदार जयंत पाटील, पक्षाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष हेमंत टकले, खासदार फौजिया खान, आमदार अनिल देशमुख, आमदार अशोक पवार, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार अरुण लाड, आमदार संदीप क्षीरसागर, प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा ऍड. रोहिणीताई खडसे व यांसह इतर प्रमुख मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या शिबिरात मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, नेत्यांनी पक्ष सोडल्यामुळे तुम्हाला पुढे बसण्याची संधी मिळाली नाहीतर तुम्हाला पुढे येण्याची संधी मिळाली नसती. त्यामुळे पुढे बसलेल्यांनी गेलेल्यांचे आभार माना. आपल्या नेत्यांना त्रास देण्याचे काम झाले. अनिल देशमुखांसारख्या नेतृत्वाला तुरुंगात जायची वेळ आली. नवाब मलिकांवर काय प्रसंग आला सगळ्यांना माहिती आहे. आपल्या सर्वांना या त्रासातून पुढे जाताना शरद पवार साहेबांची साथ न सोडण्याचं आम्ही ठरवलं. आम्ही शाहू-फुले आंबेडकरांचे विचार मांडतो. शरद पवारांनी उभ्या आयुष्यात हा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वाभिमानाची ज्योत पेटवली. महात्मा फुलेंनी ज्ञानाची ज्योत, छत्रपती शाहू महाराजांनी समतेची ज्योत आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी अस्मितेची ज्योत आपल्या मनात पेटवली. या सर्व महापुरुषांचा आदर्श घेऊन डॉ. बाबासाहेबांनी संविधानाची चौकट आखली असे जयंत पाटील म्हणाले.
जयंत पाटील म्हणाले की, तसेच समाजात अनेक घटक मागे राहिले त्यांना आरक्षणाच्या माध्यमातून पुढे आणण्याचे काम छत्रपती शाहू महाराजांनी केले. त्यानंतर समाजात केवळ जातीभेद नसून स्त्री-पुरुष भेदही आहे. त्यातून महात्मा फुलेंनी महिलांना पुढे आणण्याचा विचार दिला. हाच विचार घटनेच्या चौकटीत बसवण्याचं महान काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. राष्ट्रवादीला पुरोगामी विचारांची ज्योत पेटवत राहायची आहे. पुढील २ दिवसांच्या शिबिरात अनेक विचार आपल्यासमोर येतील. देशातील परिस्थिती आपल्या समोर येईल. आपण बोलण्यात कमी पडतोय. समोरच्या बाजूने जाहिरात प्रचंड आहे. त्यामुळे आपले बोलणे दाखवले जात नाही किंवा प्रचार होत नाही. लोक ऐकत असतात. आपण सगळ्यांनी बोलले पाहिजे. ज्या विचारांसाठी राजकारण करतोय त्याला महत्त्व दिले पाहिजे असेही आवाहन जयंत पाटील यांनी केले.
पुढे जयंत पाटील म्हणाले की, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कष्टानं काम केलं आहे. खासदार कोल्हे यांनी तर शेतकरी आक्रोश मोर्चा काढून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. आता मात्र त्यांना निवडणुकीत पाडण्याचा विडा काही जणांनी उचलला आहे. पण जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आणि आई भवानींचा तुम्हाला आशिर्वाद आहे तोपर्यंत तुम्ही घाबरण्याचं काहीच कारण नाही. सर्व पक्ष तुमच्यासोबत उभा आहे असे जयंत पाटील म्हणाले.
जयंत पाटील म्हणाले की, आगामी काळ निवडणुकांचा आहे. आता आपण एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. आपला पक्ष फुटला आहे. त्यामुळे मागच्या लोकांना पुढील रांगेत बसण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे आता जे पुढं बसले आहेत त्यांनी सोडून गेलेल्यांचे आभार मानावेत अशी मिश्कील टिप्पणी केली. त्यावेळी सभागृहात हास्यकल्लोळ उडाला.
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने समतेचा विचार पुन्हा महाराष्ट्रात आणि देशात टिकावा यासाठी सुरू केलेली या शिबिराची ज्योत मला खात्री आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक सामान्य माणसापर्यंत पोहोचण्याचे काम तुम्ही आम्ही सर्व मिळून करू असा विश्वास जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला आहे. आपल्या समोर देखील येणाऱ्या काळामध्ये संघर्ष उभा राहिलेला आहे. येणारी निवडणुकीचं वर्ष म्हणजे संघर्षाचे वर्ष आहे .या निवडणुकीचा काळ २०२४ चा होणार आहे. या काळामध्ये आपण सर्वजणांनी वैचारिक संघर्ष करण्यासाठी भविष्य काळामध्ये ठामपणाने काम करण्याची गरज आहे. असेही जयंत पाटील यांनी सांगितले आहे.