२८ डिसेंबरच्या महारॅलीसाठी नागपूरची ऐतिहासिक भूमी सज्ज – नाना पटोले
काँग्रेस स्थापना दिन महारॅलीसाठी ‘भारत जोडो मैदान’ व ‘है तैयार हम’ घोषवाक्य.
महारॅलीला मल्लिकार्जुन खर्गेजी, सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी, प्रियंकाजी गांधींसह काँग्रेसचे देशभरातील नेते उपस्थित राहणार.
नागपूर,
काँग्रेस पक्षाचा स्थापन दिवस २८ डिसेंबर यावर्षी नागपूरच्या ऐतिहासिक भूमित महारॅलीने साजरा केला जात आहे. काँग्रेसचा १३८ वा वर्धापन दिन नागपूरमध्ये होत आहे ही नागपूर व महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बाब आहे. है तैयार हम महारॅलीमुळे महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह व आनंद आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे जी, सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी, प्रियंकाजी गांधी, काँग्रेसचे मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, विरोधी पक्षनेते, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य यांच्यासह हजारो पदाधिकारी व लाखो काँग्रेस कार्यकर्ते या रॅलीला उपस्थित राहणार आहेत. ज्या मैदानात हा मेळावा होत आहे त्याला ‘भारत जोडो मैदान’ असे नाव दिले असून ‘है तैयार हम’ अशी या महारॅलीची संकल्पना असून मेळाव्याची सर्व तयारी झाली आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
नागपूर येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, स्वातंत्र्य चळवळीत डिसेंबर १९२० मध्ये नागपूरच्या भूमितूनच महात्मा गांधी यांनी जुलमी, अत्याचारी ब्रिटिश सत्तेविरोधात असहकार आंदोलनाचा नारा दिला होता. शेवटी १९४७ मध्ये ब्रिटिशांना भारत देश सोडून पळून जावे लागले हा इतिहास आहे. नागपूर हे देशातील मध्यवर्ती ठिकाण आहे. नागपूरमधूनच १९५९ मध्ये इंदिराजी गांधी यांना राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्याची घोषणा केली गेली होती. अशा ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या नागपूर शहरात काँग्रेसचा १३८ वा स्थापना दिवस साजरा होत आहे ही काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी महत्वाची व आनंदाची बाब आहे.
आज देशात लोकशाही व संविधान संपवण्याचे काम केले जात आहे, भारतीय जनता पक्षाच्या सरकारने अत्याचारी व्यवस्था निर्माण केली आहे. महागाई, बेरोजगारी, शेतकरी, कामगार यांचे प्रश्न गंभीर झाले आहेत. भाजपा सरकारने निर्माण केलेल्या या अत्याचारी व्यवस्थेला संपवण्यासाठी, भ्रष्टाचारमुक्त भारत, अत्याचारमुक्त भारत निर्माण करण्याबरोबरच रोजगार निर्मिती करणे, महागाई कमी करणे, शेतकरी,कामगार यांना न्याय देणे, लोकशाही व संविधान वाचवणे हे काँग्रेस पक्षाचे दायित्व आहे आणि त्यासाठीच ‘है तैयार हम’ अशी संकल्पना मांडलेली आहे. नागपूरमध्ये होत असलेल्या या मेळाव्यासाठी राज्यभरातून लाखो लोक उपस्थित राहणार आहेत.
ईव्हीएम संदर्भात पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, ईव्हीएमवर लोकांमध्ये संशय आहे, त्याची दखल निवडणुक आयोगाने घेतली पाहिजे. लोकांना वाटते त्यांचे मत दुसऱ्या पक्षाला जाते त्याचा गांभिर्याने विचार झाला पाहिजे. मतदान पत्रिकेवर मतदान घ्यावे ही जर लोकांची मागणी असेल तर त्याची दखल केंद्र सरकारने व निवडणुक आयोगाने घेतली पाहिजे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना हेच नरेंद्र मोदी ईव्हीएमला विरोध करत होते.
या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, सतिश चतुर्वेदी, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, विधान परिषद सदस्य अभिजीत वंजारी, आमदार वजाहत मिर्झा, प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, आदी उपस्थित होते.