Mumbai: जोरदार जनमर्थनासह आमदार अँड. आशिष शेलार यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
कोळी बांधवांनी सादर केले पारंपरिक नृत्य; दहिहंडी पथकाची ५ थरांची सलामी
मुंबई, दि. 25: भाजपचे मुंबई अध्यक्ष तथा महायुतीचे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील उमेदवार आमदार अँड. आशिष शेलार यांनी शुक्रवार, दि. २५ ऑक्टोबर रोजी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी कोळी बांधवांनी पारंपरिक नृत्य सादर केले, तर दहिहंडी पथकांनी ५ थरांची सलामी देत आमदार शेलार यांना अनोख्या शुभेच्छा दिल्या.
आ. आशिष शेलार यांनी सुरुवातीला श्री सिद्धिविनायकांचे दर्शन घेतले. यावेळी पत्नी अँड प्रतिमा शेलार त्यांच्यासोबत उपस्थित होत्या. त्यानंतर वांद्रे पश्चिम मतदारसंघातील जरीमरी मातेच्या चरणी ते नतमस्तक झाले. लिंकिंग रोड येथील निवडणूक कार्यालयाजवळून त्यांच्या रॅलीला सुरुवात झाली. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली. खारदांड्याच्या कोळीवाड्यातील कोळी बांधव पारंपरिक वेषभूषेत सहभागी झाले. तसेच विविध गणेशोत्सव आणि सार्वजनिक उत्सव मंडळांचे युवा कार्यकर्ते आणि त्यांच्या बॅण्ड पथकांनी मिरवणुकीची शोभा वाढवली. कोळी बॅण्ड आणि कोळी नृत्य या रॅलीचे विशेष आकर्षण ठरले.
ढोल पथकांच्या तालावर ठेका धरलेल्या तरुणाईच्या घोषणांनी वांद्रे पश्चिमेकडील परिसर दुमदुमून गेला. ‘आशिषजी आप आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ म्हणत सर्व धर्मीय, सर्व भाषिक नागरिक रॅलीत उत्स्फुर्तपणे सहभागी झाले. १० वर्षांपासून आमदार, सर्वसमावेशक नेतृत्त्व अशी ख्याती असलेल्या आ. शेलार यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी, मित्रपरिवार उपस्थित होता. लिंकींग रोड, १३ वा रस्ता, १९ वा रस्ता, १८ वा रस्ता, चित्रकार धुरंदर मार्ग अशा १ किमी लांबीच्या रॅलीची समाप्ती खार येथील आर. व्ही. टेक्निकल हायस्कूलजवळ झाली.
……………
महायुतीच्या नेत्यांची उपस्थिती
खार येथील आर. व्ही. टेक्निकल हायस्कूलमध्ये आमदार आशिष शेलार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी त्यांच्या पत्नी ॲड. प्रतिमा शेलार, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, भाजपचे वांद्रे पश्चिम विधानसभा अध्यक्ष किशोर पुनवत, माजी नगरसेविका स्वप्ना म्हात्रे, अलका केरकर, हेतल गाला, शिवसेनेचे राहुल कनाल, कुणाल सरमळकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते ( ऍक्टिव्हिस्ट) ही सहभागी झाल्या होत्या.
………….
पुढच्या पाच वर्षांचे व्हिजन काय?
पुढच्या पाच वर्षांत वांद्रे, खार, सांताक्रुझमध्ये राहणाऱ्या मालमत्तांचा दर १० पटींनी वाढेल, इतक्या मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा आम्ही उभ्या करीत आहोत. झोपडपट्टीवासीयांना पक्की घरे त्याच ठिकाणी मिळतील, याची योजना तयार करून कालबद्ध विकास करणार आहोत. प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते. त्यामुळे आम्ही केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवून या निवडणुकीत विजय मिळवू. मुंबईत महाविकास आघाडीला दोन अंकी संख्याही गाठता येणार नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे भाजपला मोठे यश मिळवून देऊ, असा विश्वास आशिष शेलार यांनी माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केला.